सावंतवाडीतील रात्रीची घटना ; भजन करून घरी परतत असताना काळाची झडप
सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडीत घरगुती गणपतीच्या ठिकाणी भजन करुन पुन्हा आपल्या गावी आंजिवडे (ता. कुडाळ) येथे मोटरसायकलने परतत असताना राजवाडा परिसरात साधले मेसजवळ भले मोठे भेलदा माडाचे झाड थेट अंगावर पडल्यामुळे दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना वीज वाहिन्यांचा स्पर्श झाल्याचा संशय आहे. ही घटना मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास राजवाड्याच्या बाजूला असलेल्या परिमल टॉवर समोर घडली. राहुल प्रकाश पंदारे (वय २४) व समीर ऊर्फ दत्ताराम पंदारे (वय २१) रा. आजिवडे गवळीवाडी(ता.कुडाळ)अशी या दोघांची नावे आहेत. गोठण परिसरात राहत असणारे दशावतार कलाकार गौरव शिर्के यांच्या सोबत भजनासाठी ते आले होते. तेथून परतत असताना हा अपघात घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल पंदारे, समीर पंदारे य दोघेही युवक सावंतवाडीतील गोठण येथे भजनासाठी आले होते. तेथून मोटरसायकलने परत जात असताना राजवाडा परिसरात त्यांच्या अंगावर भेडले माडाचे झाड कोसळले. यात त्या दोघांचा मृत्यू झाला. अशी माहिती तेथील काही युवकांना कळाली त्यांनी तात्काळ माजी नगराध्यक्ष संजू परब यांना ही माहिती दिली. त्यांनी तात्काळ पालिका व पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच त्या ठिकाणी पालिकेचा बंब व रुग्णवाहिका दाखल झाली. कटरच्या साह्याने त्या दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.. परंतु अंगावर झाडाचा भाग कोसळल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तब्बल दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर झाडाखाली अडकलेला १ मृतदेह बाहेर काढण्यात आला. अपघात झाल्याचे लक्षात येताच त्या ठिकाणी माजी नगरसेवक संजय पेडणेकर, रवी जाधव, रॉक्सन डान्टस, बाबा अल्मेडा, डॉ. मुरली चव्हाण, हेमंत पांगम, विनायक गावस, लादु रायका, मोसीन मुल्ला, अॅलेक्स डिसोजा आशिष रायकर राजु मसुरकर आदींसह सावंतवाडी पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, आरोग्य निरीक्षक वैभव नाटेकर, नंदू गावकर आदींनी त्या ठिकाणी मदत कार्यात सहभाग घेतला. कटरच्या साह्याने झाड कापून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर हे मृतदेह सावंतवाडी कुटीर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी व रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, अमित गोते, सुरज पाटील, आदींनी त्या ठिकाणी धाव घेऊन सहकार्य केले. दरम्यान यावेळी सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखनराजे भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली.. राहुल यांच्या पश्चात आई-वडील भाऊ बहीण तर समीर यांच्या पश्चात आई-वडील भाऊ बहीण असा परिवार आहे. राहुल हा गोव्यात कामाला होता तसेच तो बुवा म्हणून काम करत होता. तर समीर हा सावंतवाडी राणी पर्वती देवी कनिष्ठ महाविद्यालयात बारावी मध्ये शिकत होता . तो राहुल याच्यासोबत भजनाला आला होता . त्यांच्या निधनाने माणगाव खोऱ्यात दुःखाचे सावट पसरले आहे. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते तेथे अंजिवडेतील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.