भारतीयाला संबोधिले पॅरासाइट
वृत्तसंस्था/ वॉर्सा
अमेरिकेत भारतीयांच्या विरोधात वंशद्वेषाचे प्रकार वाढले असताना आता युरोपमध्येही अशीच घटना घडली आहे. पोलंडमध्ये एका भारतीय युवकासोबत गैरवर्तन करत त्याला शिव्या देण्यात आल्या आहेत. एका अमेरिकन नागरिकाने भारतीयाला पॅरासाइट म्हणजेच परजीवी संबोधिले आहे. पीडित भारतीय युवकाचे नाव अद्याप समोर आलेले नाही, परंतु शिव्या देणारा व्यक्ती अमेरिकेचा नागरिक असल्याचे उघड झाले आहे. यापूर्वी अमेरिकेत 4 भारतीय महिलांना शिव्या देण्यात आल्या होत्या.
एका अमेरिकन व्यक्तीला भारतीय युवकाने व्हिडिओ तयार करण्यास मनाई केली होती. तरीही अमेरिकन नागरिक त्याला हा माझा देश असल्याने मी व्हिडिओ तयार करू शकतो असे सांगत असल्याचे यात दिसून येते. ‘तू पोलंडमध्ये का आला आहेस? अमेरिकेतही भारतीयांची संख्या खूपच अधिक आहे आणि तुम्ही लोक पोलंडमध्ये काय करत आहात? तुम्ही पोलंडवर आक्रमण करू शकाल असे तुम्हाला वाटते का? तुमचा स्वतःचा देश आहे, तुम्ही तुमच्या देशात परत का जात नाही’’ असे या अमेरिकन नागरिकाने भारतीयाला उद्देशून म्हटले आहे.
तुम्ही भारतीय गोऱया (श्वेतवर्णीय) लोकांच्या भूमीवर का येत आहात? तुम्ही पॅरासाइट का होत चालला आहात? तुम्ही आमचा वांशिक नरसंहार करत आहात. तुम्ही आक्रमण करत असून युरोपमध्ये आम्ही तुम्हाला पाहू इच्छित नाही. पोलंड पोलिश लोकांचा आहे असे या अमेरिकन नागरिकाने म्हटल्याचे व्हिडिओत दिसून येते. याप्रकरणी अद्याप तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. या घटनेवेळी तेथे उपस्थित अन्य लोकांनी याचे मोबाइलवर चित्रण केले आहे.