प्रतिनिधी /फोंडा
आषाढी एकादशीनिमित्त गोव्यातून पंढरपूरला पायी वारीला निघालेल्या वारकऱयांची किर्तनकार सुहासबुवा वझे यांनी सिंधुदुर्गांत जाऊन भेट घेत, त्यांच्यासोबत एक दिवस घालविला. दोडामार्ग, भेडशी, कोनाळकट्टा, तिराळी, रामघाटमेढेपर्यंत वझे बुवांनी वारकऱयांची साथ केली. यावेळी वझे बुवांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी मंडळींनी नामस्मरण, नामदींडी व हरिनामाचा गजर केला.
मुळगाव वारकरी संस्था, अस्नोडा वारकरी संस्था, देवी सातेरी भगवती वारकरी मंडळ हळदोणा, ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळ मेणकुरे, वारकरी मंडळ मुळगाव आदी वारकरी समुहाच्या वझेबुवांनी गाठीभेटी घेतल्या. पायी वारीतील त्यांचे अनुभवही जाणून घेतले. गोव्यातून साधारण 700 वारकरी पंढरपूरच्या पायी वारीला निघाले आहे. यावेळी फोंडा किर्तन विद्यालयाच्या पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी देवानंद सुर्लकर, दामोदर कामत, संतोष कुर्टीकर, बाळकृष्ण कदम हे उपस्थित होते.