नितीश राणा-रिंकू सिंग यांची चौथ्या गडय़ासाठी 66 धावांची अभेद्य भागीदारी निर्णायक
मुंबई / वृत्तसंस्था
नितीश राणा (37 चेंडूत नाबाद 48) व रिंकू सिंग (23 चेंडूत नाबाद 42) यांनी चौथ्या गडय़ासाठी अवघ्या 38 चेंडूत 66 धावांची अभेद्य भागीदारी साकारल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने बलाढय़ राजस्थान रॉयल्सला तब्बल 7 गडी राखून धूळ चारली. प्रारंभी, राजस्थानला निर्धारित 20 षटकात 5 बाद 152 धावांवर रोखल्यानंतर केकेआरने विजयाचे लक्ष्य 7 गडी व 5 चेंडूंचा खेळ बाकी राखत सहज साध्य केले.
विजयासाठी 153 धावांचे तुलनेने माफक आव्हान असताना बाबा इंद्रजीत (15) व ऍरॉन फिंच (4) ही केकेआरची सलामी जोडी अवघ्या 22 धावांमध्ये तंबूत परतली. पण, त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने 32 चेंडूत 34 धावांचे योगदान दिले आणि तो बाद झाल्यानंतर नितीश राणा व रिंकू सिंग यांनी विजयाची मोहीम फत्ते केली. शेवटच्या षटकात अवघ्या एका धावेची गरज असताना राणाने थर्डमॅनवरुन अप्पर कटचा षटकार फटकावत विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले. प्रारंभी, संजू सॅमसनचे अर्धशतक व शिमरॉन हेतमेयरच्या नाबाद 27 धावांच्या जलद खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने दीडशतकी टप्पा पार केला. वानखेडे स्टेडियमवरील या लढतीत सॅमसनने 54 धावा फटकावल्या तर हेतमेयरने 13 चेंडूत नाबाद 27 धावांचे योगदान दिले.
प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर सलामीवीर देवदत्त पडिक्कल स्वस्तात बाद झाल्यानंतर राजस्थानची खराब सुरुवात झाली होती. उमेश यादवने त्याचा परतीचा झेल टिपला, त्यावेळी राजस्थानच्या तिसऱया षटकात केवळ 7 धावा झाल्या होत्या. नंतर कर्णधार संजू सॅमसन बटलरच्या साथीला क्रीझवर आला आणि या जोडीने डावाला आकार देण्याची मोहीम सुरु केली.
या जोडीने 8 व्या षटकात संघाचे अर्धशतक फलकावर लावले. नंतर टीम साऊदीने बटलरला 9 व्या षटकात बाद केले, त्यावेळी संघाची 2 बाद 55 अशी स्थिती होती. करुण नायरने 13 चेंडूत 13 धावा केल्या अनुकूल रॉयने त्याची खेळी संपुष्टात आणली. त्यानंतर रियान परागने (12 चेंडूत 19) बाद होण्यापूर्वी थोडीफार फटकेबाजी केली. पुढे मावीने सॅमसनला बाद करत राजस्थानला आणखी एक धक्का दिला. त्यानंतर हेतमेयर व अश्विन यांनी प्रत्येक चेंडूवर समाचार घेण्यावर भर दिला. या जोडीने साऊदीच्या 19 व्या षटकात 20 धावा फटकावल्या.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स ः 20 षटकात 5 बाद 152 (संजू सॅमसन 49 चेंडूत 7 चौकार, 1 षटकारासह 54, शिमरॉन हेतमेयर 13 चेंडूत 1 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 27, जोस बटलर 25 चेंडूत 22, करुण नायर 13, रियान पराग 27. अवांतर 9. टीम साऊदी 2-46, उमेश यादव, अनुकूल रॉय, शिवम मावी प्रत्येकी 1 बळी)
कोलकाता नाईट रायडस& ः 19.1 षटकात 3 बाद 158 (नितीश राणा 37 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 48, रिंकू सिंग 23 चेंडूत 6 चौकार, 1 षटकारासह नाबाद 42, श्रेयस अय्यर 32 चेंडूत 34, बाबा इंद्रजीत 15, ऍरॉन फिंच 4. अवांतर 15. बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप सेन प्रत्येकी 1 बळी).