नवी मुंबई / वृत्तसंस्था
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलला शिस्तभंग केल्याबद्दल 20 टक्के मानधन कपातीचा दंड ठोठावण्यात आला. आरसीबीविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यात शिस्तभंग केल्याचा त्याच्यावर ठपका होता. ही कारवाई का करण्यात आली, याचा नेमका खुलासा आयपीएल कार्यकारिणीने केला नाही. मात्र, केएल राहुलने आपल्यावरील ठपका मान्य केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राहुलचा संघसहकारी मार्कस स्टोईनिसला देखील शिस्तभंग केल्याप्रकरणी समज देण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी झालेली ही लढत आरसीबीने 18 धावांनी जिंकली होती.
स्टोईनिसवरील आरोपाचा खुलासाही केला गेला नाही. मात्र, जोश हॅझलवूड गोलंदाजी करत असताना स्टोईनिसने मैदानी पंचांशी हुज्जत घातल्याचे निदर्शनास आले होते.