विमानतळ अधिकाऱ्यांची बेळगावला भेट : अंतर्गत सुविधा, सुरक्षा यंत्रणांसह विविध विषयांवर चर्चा
प्रतिनिधी /बेळगाव
कोल्हापूर विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील काही दिवसांत विमानफेऱ्याही वाढल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूर विमानतळाचा विकास बेळगाव विमानतळाच्या धर्तीवर करण्यासाठी दोन्ही विमानतळांच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. अंतर्गत सुविधा, सुरक्षा यंत्रणा यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी कोल्हापूर विमानतळाचे संचालक व इतर अधिकाऱ्यांचे स्वागत केले. सर्व अधिकाऱ्यांनी बेळगाव विमानतळावरील सुविधांचा आढावा घेतला. कोल्हापूर विमानतळाचा विस्तार होत असल्याने सुरक्षा यंत्रणांबाबत चर्चा करण्यात आली. बेळगावमधून एकेकाळी महिन्याला 35 ते 40 हजार प्रवासी प्रवास करीत होते. त्यामुळे प्रवाशांचे व्यवस्थापन, सुविधा यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली.
कोल्हापूर व बेळगाव ही दोन्ही विमानतळे अवघ्या 100 कि. मी. च्या अंतरात असल्यामुळे भौगोलिकदृष्ट्या साम्य आहे. बेळगाव पाठोपाठ कोल्हापूरमध्येही विमानसेवेने चांगली गती घेतली असल्याने बेळगावच्या धर्तीवर कोल्हापूरचा विकास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी बेळगाव विमानतळाचे उपसंचालक देसाई, महेंद्र साळवी आदी उपस्थित होते.