जातीवंत म्हैस खरेदीसाठी प्रोत्साहन, तरीही संकलनात घट, दूध संघाचे सुमारे पाचशे पशुपालक वेटींगवर
धीरज बरगे कोल्हापूर
‘गोकुळ’ने जातीवंत म्हैस खरेदीसाठी 2022-23 आर्थिक वर्षात ‘गोकुळ’शी संलग्न 262 दूध संस्थांच्या माध्यमातून 1575 म्हैस खरेदीसाठी 3 कोटी 6 लाख 69 हजार रूपयांइतके अनुदान पशुपालकांना दिले आहे. या आर्थिक वर्षासह गेल्या दोन आर्थिक वर्षातील म्हैस खरेदी अनुदानाची आकडेवारी पाहता जिल्ह्यात 4 हजार 371 इतक्या जातीवंत म्हैस दाखल झाल्या. जातीवंत म्हैस खरेदीसाठी अनुदान देऊन दूध उत्पादकांना जिल्हा दूध संघ प्रोत्साहन देत आहे. दूध उत्पादकांतूनही प्रतिसादही मिळत आहे. पण यातून संकलनात वाढ झालेली दिसून येत नाही. मग ‘गोकुळ’च म्हैस दूध नेमकं जातंय कुठं, याच उत्तर शोधण्याची वेळ आली आहे.
दुग्धोत्पादन व्यवसाय तोट्याचा ठरत असल्याने ग्रामीण तरुण पिढी यापासून बाजूला जात आहे. त्याचा परिणाम ग्रामीण दुग्ध व्यवसायावर झाला आहे. गाय व म्हैस दूध उत्पादनात घट होत आहे. मात्र दोन वर्षात गाय व म्हैस दूध खरेदी दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या व्यवसायातून ग्रामीण बेरोजगारांना चांगला रोजगार प्राप्त होऊ शकतो. दूध उत्पादनामध्येही वाढ होण्यास मदत होईल, या उद्देशाने ‘गोकुळ’कडून जातीवंत म्हैस खरेदीसाठी अनुदान दिले जाते. पंजाब, हरियाणा, गुजरात येथून जातीवंत म्हैस जिल्ह्यात आणून म्हैस दूध उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न संघाकडून सुरु आहे. मात्र काही कारणास्तव दूध संस्था संघापासून दूर जात आहेत. याचा परिणाम संघाच्या म्हैस दूध संकलनावर होत आहे.
वर्षभरात दूध खरेदी दरात 10 रुपयांची वाढ
देशातील दूध उत्पादनात घट झाल्याने राज्यासह देशभरातील दूध संघांचा मागणी आणि पुरवठ्याचा ताळमेळ बिघडला आहे. त्यामुळे वर्षभरात दूध संघांकडून दूध खरेदी व विक्री दरात वारंवार वाढ करण्यात आली. जिल्हा दूध संघाने दीड वर्षात म्हैस दूध खरेदी दरात 10 रुपयांची तर गाय दूध खरेदी दरात 11 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत व्यवसाय दूध उत्पादकांसाठी फायदेशीर ठरत असला तरी सद्यस्थितीत जिल्ह्dयातून दूध संकलन वाढवण्याचे आव्हान ‘गोकुळ’समोर असणार आहे.
म्हैस खरेदीसाठी 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत अनुदान
‘गोकुळ’शी संलग्न दूध संस्थांच्या सभासदांना जातीवंत म्हैस खरेदीसाठी संघाकडून अनुदान दिले जाते. हरियाणा, पंजाब येथील म्हैस खरेदीसाठी 30 हजार तर गुजरातमधील म्हैस खरेदीसाठी 25 हजार रूपयांइतके अनुदान दिले जाते. मात्र ते म्हैस खरेदीनंतर 3 वर्षांनी संबंधित पशुपालकाला मिळते. म्हैस खरेदीसाठीचा प्रवास खर्च म्हणून तत्काळ पाच हजार रुपये संबंधित पशुपालकाला दिले जातात.
प्रतिवर्षी सुमारे 1500 म्हैस खरेदीसाठी अनुदान
‘गोकुळ’कडून प्रतिवर्षी सुमारे 1200 ते 1500 जातीवंत म्हैस खरेदीसाठी अनुदान दिले जाते. दोन आर्थिक वर्षांसह चालू आर्थिक वर्षांत सुमारे 4 हजार 371 जातीवंत म्हैस जिल्ह्यात दाखल झाल्या. म्हैस खरेदीसाठी दूध संघ अनुदान देऊन प्रोत्साहन देत असला तरी त्या तुलनेत म्हैस दूध संकलनात वाढ होत नसल्याचे दिसून येत आहे.
तीन वर्षांतील जातीवंत म्हैस खरेदीची आकडेवारी
वर्ष जातीवंत म्हैस खरेदी संख्या
2021-22 1658
2022-23 1575
2023-24 1138 (ऑगस्टअखेर)
एकूण 4371