15 विद्यमान संचालकांस दोन नवीन चेहरांना संधी : 2 विद्यमान संचालकांची माघार, 70 लाखांचा खर्च वाचला
कोल्हापूर प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या आणि शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या श्री महालक्ष्मी को. ऑप. बँकेची 2023 ते 2028 या वर्षासाठीची निवडणूक सोमवारी बिनविरोध झाली. बँकेच्या 90 वर्षाच्या इतिहासात प्रथमच निवडणूक बिनविरोध झाली आहे. यामध्ये दोन विद्यमान संचालकांनी माघार घेतली असून दोन उमेदवारांना नव्याने संधी मिळाली आहे. यामुळेच बँकेची निवडणूक बिनविरोध होवू शकली.
महालक्ष्मी बँकेची 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होती. एकूण 52 उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी 35 उमेदवारांनी माघारी घेतली. यामध्ये 26 उमेदवारांनी शुक्रवारपर्यंत अर्ज माघार घेतले होते. सत्ताधारीच्या विरोधात 9 उमेदवार रिंगणात होते. सोमवारी अर्ज माघारीचा अंतिम दिवस होता. यामध्ये बिनविरोध निवडणूक होण्यासाठी हालचाली जोरदार सुरू झाल्या. सत्तारूड पॅनेलमधील प्रकाश सांगलीकर आणि अॅङ नरेंद्र खासबागदार यांच्यासह 7 उमेदवारांनी अर्ज माघार घेतले. यामुळे बँकेच्या 90 वर्षाच्या इतिहासत प्रथम निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये विरोधातील श्रीधर कुलकर्णी आणि डॉ. रूपा नागांवकर यांना प्रथमच संधी मिळाली. बिनविरोध निवडणूक झाल्याने निवडणूकीवरील सुमारे 70 लाखांचा खर्च वाचला आहे. बँकेत प्रथमच तीन महिला सदस्या झाल्या आहेत. यामध्ये दोन महिला प्रतिनिधी गटातून तर एक सर्वसाधारण गटातून निवडून आल्या आहेत. निवडणूकीचे कामकाज जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी पाहीले.
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार
बँकेचे विद्यमान अध्यक्ष अॅड. राजेंद्र किंकर, उपाध्यक्षा पद्यजा आपटे, अॅड. अशोक मुंडरगी, विनोद डिग्रजकर, महेश धर्माधिकारी, संदिप कुलकर्णी, उदय महेकर, अॅड. रघुनाथ लाटकर, अॅड. रवि शिराळकर, केदार हसबनीस, श्रीकांत हेर्लेकर, श्रीधर कुलकर्णी, डॉ. रुपा नागावकर, प्रशांत कासार, कृष्णा काशिद, नितिन डोईफोडे, मेघा जोशी.
अॅड, राजेंद्र किंकर ठरले किंगमेकर
बिनविरोध निवडीमध्ये विद्यमान अध्यक्ष राजेंद्र किंकर किंगमेकर ठरले. गेले दीड महिने यासाठी ते धडपड करत होते. विरोधातील उमेदवारांना प्रत्यक्ष भेटून त्यांची समजूत काढण्यात त्यांना यश आले. विद्यमान उपध्यक्षा पद्यजा आपटे, बँकेचे, ज्येष्ठ संचालक अॅड. अशोक मुंडरगी, विनोद डिग्रजकर, महेश धर्माधिकारी, अॅड. नरेंद्र खासबारदार, अॅड. रवि शिराळकर, सीए. केदार हसबनीस व प्रकाश सांगलीकर यांनी त्यांना मोलाची साथ दिली.
बँकेची स्थापना-1933
संचालक संख्या-17
एकूण सभासद -27 हजार
मतदानास पात्र सभासद -23 हजार
एकूण अर्ज-52
अर्ज माघार-35
अंतिम दिवशी अर्ज माघार-7
बिनविरोधामुळे सभासदांमध्ये चांगला संदेश
सध्याच्या संचालकांपैकी 90 टक्के संचालक पुढील पाच वर्षाने पुन्हा निवडणूक लढविणार नाहीत. त्यामुळे पुढील वेळी संधी मिळणार असल्याचे अर्ज केलेल्या उमेदवारांना पटवून दिले. तसेच विद्यमान दोन संचालकांनी मोठे मन करून माघार घेतली. यामुळेच निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक बिनविरोध झाल्याने बँकेचे सुमारे 70 लाख वाचले असून सभासदांमध्ये चांगला संदेश गेला आहे.
राजेंद्र किंकर, विद्यमान अध्यक्ष, महालक्ष्मी बँक