भुदरगड, राधानगरी, आजरा, चंदगड तालुक्यातील प्रत्येकी एक ग्रामपंचायतीचा समावेश; सप्टेबरमध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचे बिगुल; 13 ऑक्टोबरला मतदान, 14 ऑक्टोबरला मतमोजणी; ऑक्टोबरमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणूका लवकरच होणार जाहीर
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाने जून ते सप्टेबर 2022 अखेरपर्यंत मुदत संपणाऱया राज्यातील 1 हजार 166 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम बुधवारी जाहीर केला आहे. यामध्ये जिह्यातील भुदरगड, राधानगरी, आजरा, व चंदगड तालुक्यातील प्रत्येकी एक ग्रामपंचायतीचा समावेश असून या गावांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. 13 ऑक्टोबरला मतदान तर 14 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहे. दरम्यान ऑक्टोबरअखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सप्टेबर महिन्यातच जाहीर होणार असल्याचा अंदाज प्रशासकीय अधिकाऱयांनी व्यक्त केला.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 13 सप्टेबर रोजी तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करायची आहे. 21 ते 27 सप्टेबरअखेर सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. 28 सप्टेबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. 30 सप्टेबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. तर 14 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.