निपाणीत अरिहंत चषक व्हॉलीबॉल स्पर्धेला मोठा प्रतिसाद : अहमदनगर, वर्धा, धुळे, अकोला पराभूत
प्रतिनिधी /निपाणी
अरिहंत चषक या राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलीबॉल स्पर्धेस निपाणीत रविवारी सायंकाळी थाटात प्रारंभ झाला. यानंतर सोमवारी दिवसभर विविध संघांनी अतिशय बहारदार खेळाचे प्रदर्शन करत उपस्थितांची वाहवा मिळवली. अर्जुननगर येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या मैदानावर 22 ते 24 अखेर अरिहंत उद्योग समूह, उत्तम पाटील युवाशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने बालवीर स्पोर्ट्स क्लब यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय पातळीवरील महिला आणि पुरुष गटात या स्पर्धा सुरु आहेत.
सोमवारी दिवसभर साखळी फेरीतील सुमारे 30 सामने पार पडले. यामध्ये अहमदनगर विरुद्ध सोलापूर सामन्यात सोलापूर संघाने अहमदनगर संघाचा 2-1 अशा सेटने पराभव केला. अहमदाबाद संघाने वर्धा संघावर 2ः0, अमरावती संघाने धुळे संघावर 2-0 तर मुंबई संघाने अकोला संघावर 2-0 अशा फरकाने मात केली. हिंगोली संघाने वाशिम संघाचा 2-0, सांगली संघाने नंदुरबार संघाचा 2-0, पुणे संघाने जळगाव संघाचा 2-0, तर रत्नागिरी संघाने चंद्रपूर संघाचा 2-0 अशा सेट्सनी पराभव केला.
पुढील सामन्यात कोल्हापूर संघाने हिंगोली संघाला 2-0, नंदुरबार संघाने गडचिरोली संघाला 2-0, पुणे संघाने बीड संघाला 2-0, तर अकोला संघाने सातारा संघाला 2-0 अशा फरकाने धूळ चारली. लातूर संघाने अहमदनगर संघावर 2-0, सोलापूर संघाने नाशिक संघावर 2-0, चंद्रपूर संघाने बुलढाणा संघावर 2-0 सिंधुदुर्ग संघाने धुळे संघावर 2-0 अशाप्रकारे विजय मिळवला. ठाणे संघाने चंद्रपूर संघावर 2-1, रत्नागिरी संघाने बुलढाणा संघावर 2-0, अमरावती संघाने सिंधुदुर्ग संघावर 2-0 आणि कोल्हापूर संघाने वाशिम संघावर 2-0 अशाप्रकारे मात केली.
महिला विभागात साई गुजरात संघाने बेंगळूर स्पोर्ट्स संघाचा 2-1, डेक्कन जिमखाना पुणे संघाने महाराष्ट्र संघाचा 2-0, भिलवडी सांगली संघाने कर्नाटक संघाचा 2-0, तसेच साई केरळ संघाने महाराष्ट्र संघाचा 2-0 अशा सेटने पराभव केला.
आज अंतिम सामना रंगणार
सदर स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळत असून मंगळवारी उपांत्य फेरीतील सामने व अंतिम सामना खेळविला जाणार आहे. सायंकाळी 6 वाजता महिला विभागातील तर रात्री 8 वाजता पुरुष विभागातील संघांचा अंतिम सामना होणार आहे. यानंतर विजेत्यांना बक्षीस वितरण होणार आहे.