गेल्या काही महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांचा त्रास शहरवासियांना सोसावा लागत असून त्याचा महापालिकेने कोणताही बंदोबस्त केला नाही. त्यातच मोकाट कुत्र्याने घेतलेल्या चाव्यामुळे एका युवतीचा दुर्दैवी मृत्यु झाला असून त्यासाठी संपुर्ण महापालिका आणि आरोग्य कर्मचारी जबाबदार आहे. त्यामुळे महानगरपालिकेचा निषेध करत जबाबदार अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेवर मोर्चा नेला. या ठिकाणी त्यांनी ठिय्या आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
पहा VIDEO >>> रेबीजमुळे युवतीच्या मृत्युनंतर भाजप पदाधिकाऱ्यांकडून महापालिका अधिकारी धारेवर
शहरात गेल्या काही महिन्यात मोकाट कुत्र्यांच्या त्रासामुळे कोल्हापूरकर मोठ्या प्रमाणात हैराण झाले आहेत. कुत्रे चावल्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण गर्दी करत आहेत. मात्र असे असून ही कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.
३ फेब्रुवारी रोजी कोल्हापूरात एक दुर्वैवी घटना घडली असून २१ वर्षीय तरुणी सृष्टी पाटील हिला भटक्या कुत्र्याने चावला. तिला योग्य उपचार आणि लस न मिळाल्याने रेबीज झाला आणि त्यातच निष्पाप मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे शहरातील नागरिक व सामाजिक संघटनांकडून महापालिका प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्दैवी मृत्यूला जबाबदार कोण असे विचारणा करत आज भाजप च्या वतीने महानगरपालिकेमध्ये निदर्शने करत गोंधळ घालण्यात आला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेचे गेट उघडून महापालिकेची रत आयुक्त के मंजू लक्ष्मी यांच्या दालनासमोर ठेयामारत जोरदार घोषणाबाजी केली आहे तसेच आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.