सुरेश पाटील/पुलाची शिरोली
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली ग्रामपंचायतीमध्ये मतदारांनी सत्तांतर घडवले. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाडिक आघाडीने अवघ्या पाच वर्षांत पुन्हा सत्ता काबीज केली. महाडिक गटाच्या लोकनियुक्त पहिल्या महिला सरपंचपदी सौ. पद्मजा कृष्णात करपे यांची ४४३६ इतक्या प्रचंड मतांनी विजयी झाल्याचे समजताच महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.
सत्ताधारी शाहू स्वाभिमानी आघाडी आणि विरोधी महाडिक गटाची ग्रामविकास आघाडी यांच्यामध्ये थेट लढत झाली. सत्ताधारी आघाडीच्या सरपंचपदाच्या उमेदवार माजी ग्रामपंचायत सदस्या सौ. रुपाली खवरे यांचा पराभव झाला. राजूबाबा आवळे व डॉ. सुजित मिणचेकर या आजीमाजी आमदार गटासाठी हा धक्का आहे.
ग्रामपंचायतीमध्ये बदल घडवायचा या इराद्याने महाडिक गटाने अत्यंत शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा राबवली होती. माजी आमदार अमल महाडिक, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा व गोकुळच्या संचालिका सौ. शौमिका महाडिक यांनी निवडणुकीत जातीने लक्ष घातले होते. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी निवडणुकीपूर्वी शिरोलीत जेष्ठ नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. महाडिक आघाडीकडून सरपंचपदासाठी चार महिला इच्छुक होत्या. यामध्ये माजी उपसरपंच कृष्णात करपे यांच्या पत्नी सौ. पद्मजा यांना उमेदवारी मिळाली. सरपंच पदाची उमेदवारी निश्चित झाल्यापासून महाडिक गटाने प्रचारात आघाडी घेतली होती. निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये विकास कामातील भ्रष्ठाचारावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. माजी सरपंच शशिकांत खवरे यांच्या कामकाजाविषयी विरोधकांनी आक्षेप नोंदवले होते. दरम्यान सत्ताधारी शाहू आघाडीकडून शशिकांत खवरे, महेश चव्हाण, अनिल खवरे यांनी निवडणूक हाताळली. शाहू स्वाभिमानी आघाडीकडून सरपंचपदाच्या उमेदवार सौ. रुपाली या पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल खवरे यांच्या पत्नी आहेत. सरपंचपदासाठी ग्रामपंचायत सदस्या सौ. उर्मिला जाधव या अपक्ष रिंगणात होत्या. ग्रामपंचायतीच्या एकूण १७ जागेसाठी ४५ उमेदवार रिंगणात होते. पहिल्या फेरीपासूनच महाडिक गटाने आघाडी घेतली होती. ग्रामपंचायतीच्या सतरापैकी सोळा जागा महाडिक गटाने जिंकल्या. सरपंच पदाच्या निवडीतही चार हजाराहून अधिक मताधिक्याने पद्मजा करपे विजयी झाल्या.