अहिल्या परकाळे,कोल्हापूर
Kolhapur Chitranagari : मराठी असो वा हिंदी ठराविक थाटणीच्या चित्रपटात नात्यातील मधूर सूर असोत वा विरहाचा क्षण असो,अंगावर रोमांच आणणारा उत्कंठा वाढवणारा क्षण असो, मुंबानगरीची रोजची जीवघेणी धावपळ असो, एखाद्या व्यक्तीरेखेची आयुष्याची रेखाटणीचा प्रारंभ असो,असे नानाविध प्रसंगात रेल्वे आणि स्टेशन नाही असा चित्रपट शोधूनही सापडणार नाही.आतापर्यंतच्या किमान 80 टक्के चित्रपटात रेल्वे वा स्थानक आहेच आहे.मात्र,प्रत्यक्षात रेल्वेस्थानकावर चित्रिकरण करणे म्हणजे खर्च वाढवणारे तसेच अनंत कसोट्या आणि अडचणीचे ठरते. आता कोल्हापुरातील चित्रनगरीत रेल्वेस्थानकाची उभारणी केली जाणार आहे.हे रेल्वेस्थानक चित्रनगरीत चित्रपट निर्मितीला चालना देण्यासह स्थानिक कलाकारांना उत्पन्नाचे नवा स्त्रोत देणारे ठरेल.
राज्य शासनाने चित्रनगरीच्या विकासासाठी भरीव निधी मंजूर केला आहे.या निधीतून पायाभूत सुविधांसह विविध लोकेशन,वसतिगृह,रेन वॉटर हार्वेस्टिंगचा समावेश समावेश आहे.नजीकच्या कालावधीत मालिकाच नव्हे तर चित्रपटांचेही चित्रिकरण होणार आहे.त्यामुळे कोल्हापुरातील स्थानिक दीड ते दोन हजार कलाकारांना रोजगाराची संधी कायमस्वरूपी मिळेल.गोरेगावच्या धर्तीवर कोल्हापूर चित्रनगरीचा विकास करण्यासाठी अधिवेशनात राज्य सरकारने 241 कोटी 38 लाख 65 हजार निधीची तरतूद केली आहे.यापैकी 19 कोटी 87 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असून चित्रनगरीमधील विकासात्मक कामांना वेग येईल.येथे रेल्वेस्टेशन,वसतिगृह,अंतर्गत रस्ते,साकारत आहेत.एवढेच नव्हे तर पावसाळ्यातील पाण्याचे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याने पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे.एकूणच चित्रनगरी परिसर फुलणार असल्याने स्थानिक कलाकारांना रोजगाराची संधी मिळेल,यात शंका नाही.राज्य शासनाने दिलेल्या भरीव निधीतून चित्रनगरीत सुविधा आणि कोल्हापुरातील बेस्ट लोकेशन निर्माते आणि दिग्दर्शकांना खुणावतील.परिणामी अनेक मालिका, चित्रपट व मालिकाही कोल्हापुरी धाटणीच्या होतील.येथील सुविधांमुळे स्थानिक कलाकार,शास्त्रीय संगीत,नाट्यासंस्थांमधील नवनवीन कलाकार पुढे येतील, अशी कला क्षेत्रात चर्चा आहे.
चित्रनगरीसाठी दिलेल्या निधीतून प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली असून,शासनाने दिलेल्या वेळेत काम पूर्ण केले जाणार आहे.त्यानंतर चित्रनगरीतील सर्व लोकेशन चित्रिकरणासाठी खुली केली जातील.परिणामी मराठीसह हिंदी आणि कन्नड चित्रपट आणि मालिकांची संख्या वाढेल.तसेच कोल्हापुरातील फळ-भाजी,रिक्षा,धान्य,कपड्यांसह ते सर्वच जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांचा आर्थिक फायदा होईल.तसेच कोल्हापूरचे पर्यटनही आपोआप वाढेल.चित्रनगरीतील कामांची वर्क ऑर्डर येत्या काही दिवसात शासन आदेशानुसार बांधकामांना सुरूवात होणार आहे.
कोल्हापूर चित्रनगरीत साकारणार या सुविधा
-रेनवॉटर हारवेस्टिंग : 1 कोटी 10 लाख
-अंतर्गत रस्ते व पथदिव्यांसाठी : 2 कोटी 94 लाख
-चित्रिकरणासाठीच्या सर्व संसाधनासह एका बंगल्याच्या बांधकामासाठी : 2 कोटी 85 लाख
-20 खोल्यांचे वसतिगृहाचे बांधकाम व फर्निचरसाठी : 7 कोटी 98 लाख
-चित्रनगरीत रेल्वेस्थानक, एका बाजूला शहर व दुसऱ्या बाजूला ग्रामीण देखाव्यासाठी : 5 कोटी
एकूण : 19 कोटी 87 लाख.
प्रत्यक्षात रेल्वेस्थानकावर चित्रिकरण करणे सोपे नाही
चित्रपट निर्मिती करताना रेल्वेस्थानकावर चित्रिकरण करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. तसेच ठराविक वेळेत रेल्वे येते आणि जाते त्यामुळे त्या वेळेत चित्रकरण करणे जिकिरीचे बनते. केंद्र सरकारच्या नियम व अटींची पुर्तता करण्यापेक्षा चित्रनगरीत रेल्वेस्थानकाची निर्मिती केल्याने चित्रिकरण सहज, सोपे जाणार आहे. तसेच इतर स्पॉटवरही चित्रिकरण करणे सोयीचे ठरेल.
येत्या काही दिवसात वर्क ऑर्डर
हैद्राबाद येथील रामोजीराव फिल्मसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जालनापूरकर यांनी चित्रनगरीला भेट दिली आहे. तसेच अभिनेता आशुतोष गोवारीकर यांनी चित्रनगरीला नुतकीच भेट दिली असून चित्रनगरीतील अत्याधुनिक कामांचे कौतुक केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात शासनाकडून वर्क ऑर्डर काढली जाणार आहे.
आमदार ऋतुराज पाटील
गोवारीकर यांच्याकडून चित्रनगरीतील कामाचे कौतुक
कोल्हापूर चित्रनगरीतील सुविधा चित्रिकरणासाठी परिपूर्ण असल्याचे अभिनेता आशुतोष गोवारीकर यांनी सांगितले. कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर गोवारीकर यांनी चित्रनगरीला भेट देवून सुविधांची पाहणी केली. तसेच भविष्यातील कामांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी चित्रनगरीतील सुविधांबद्दल गौरोद्गार काढले.