महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेल्या टॅबलेट मुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल आणि विद्यार्थी स्वतः ला सिद्ध करेल असे मत समाजकल्याण आयुक्त विशाल लोंढे यांनी व्यक्त केले. शासनाकडून मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांना टॅबलेट संगणकाच्या वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले “या साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी आणि आपला नावलौकिक करावा” वितरणानंर आयुक्त विशाल लोंढे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत व्यवस्थापकीय संचालक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था (महाज्योती) महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या मार्फत JEE/NEET/MHT-CET चे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व डाटा सिमकार्ड देण्याच्या योजनेमधून पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल साहित्याचे वाटप करण्यात आले.
महाज्योती कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार कागदपत्रांची तपासणी करून एकूण 86 विद्यार्थी विद्यार्थिनींना मोफत टॅबलेट, डाटा सिम, हेडफोन आणि कॅरीकेस यांचे मोफत वाटप करण्यात आले असलेची माहिती समाज कल्याण निरीक्षक कल्पना पाटील यांनी दिली. सामाजिक न्याय भवन, विचारे माळ कोल्हापूर या ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमासाठी निलम गायकवाड, सुरेखा डवर, सचिन कांबळे यांनी परिश्रम घेतले.