अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप : सर्व कार्यालयांनी सदरचा उपक्रम राबविण्याचे मंत्री भुजबळ यांचे आवाहन
प्रतिनिधी/कोल्हापूर
पुणे विभागातील पुरवठा विभागा अंतर्गत पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, व सोलापूर अशा पाच जिल्हातील रास्त भाव दुकाने आणि कार्यालये यांना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून सार्वजनिक वितरण प्रणालीतील केलेल्या सुधारीत गुणवत्ता व्यवस्थापन पद्धतीसाठी आय.एस.ओ-9001/2015 तसेच पुरवठा साखळी व सुरक्षा व्यवस्थापन पद्धती आय.एस.ओ 28000-2007 हे आयएसओ नामांकन मिळाले आहे शनिवारी या प्रमाणपत्रांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मुंबईत वाटप करण्यात आले. रेशन दुकांनाच्या आयएसओ मानांकन प्रक्रियेमध्ये कोल्हापूर जिल्हा पुणे विभागात अव्वल ठरला आहे.
पुणे विभागातील पुरवठा उपआयुक्त कार्यालय, पाच जिल्हा पुरवठा कार्यालये, 2 अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालये, 60 तहसिल कार्यालये, 15 परिमंडळ कार्यालये व 80 गोदामे असून या सर्व 163 कार्यालये व गोदामांना आय. एस. ओ. 9001-2015, आय. एस. ओ. 28000-2007 हे प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच 9164 रास्तभाव दुकानांपैकी 7931 रास्तभाव दुकानांना आय. एस. ओ. 9001 2015 हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. सर्व कार्यालयांसह रास्तभाव दुकानांना एकूण 8094 प्रमाणपत्रे देण्यात आली.
यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले, पुणे विभागातील पुरवठा विभागामार्फत आयएसओ मानांकनाचे कामकाज करण्यात आलेले असून पुरवठा उपायुक्त डॉ त्रिगुण कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन हा अतिशय स्तुत्य उपक्रम राबवला आहे. अशा प्रकारचे उपक्रम केवळ पुणे विभागच नाही तर सर्व महसूली विभाग आणि खात्यांनी राबवायला हवा. राज्यात पुरवठा विभाग, रास्त भाव दुकान यांच्याबद्दल टीका केली जाते. मात्र पुणे विभागाने केलेल्या उपक्रमामुळे विभागाचे आता कौतुक होत आहे.
मंत्री भुजबळ म्हणाले, सर्व कार्यालये, गोदामे व रास्तभाव दुकाने यांची स्वच्छता, रंगरंगोटी व आदर्श रचना करण्यात आली आहे. कार्यालय व रास्तभाव दुकानांमध्ये CCTV, अग्निशामक यंत्र, स्मोक डीटेक्टर, प्रथमोपचार पेटी, आदीची व्यवस्था करण्यात आली असून सर्व आवश्यक फलक लावले आहेत. रास्तभाव दुकानदार व गोदाम मधील माथाडी कामगार यांना ओळखपत्र व गणवेश दिले आहेत. रास्त भाव दुकानदार हे केवळ रेशनिंग विकून आपला उदरनिर्वाह करू शकत नाही, हे लक्षात घेता राज्य सरकारने सीएससी सेंटरच्या माध्यमातून रास्तभाव दुकानदारांना घरगुती वापराचे गॅस सिलेंडर, बँकांचे सर्व व्यवहार, रेल्वे विमान तिकीट बुकिंग सर्व प्रकारचे बिल्स लाईट बिल, फोन बिल, पाणी बिल, मोबाईल, डीटीएच रिचार्ज, शेती विषयक सर्व सेवा, इन्कम टॅक्स रिटर्न भरणे, नवीन रेशन कार्ड, दुबाररेशन कार्ड, नावामध्ये दुरुस्ती अर्ज इत्यादी सर्व सुविधा देण्याची परवानगी दिली आहे असेही मंत्री भुजबळ यांनी स्पष्ट केले.
कोल्हापुर जिल्हा सहाय्यक पुरवठा अधिकारी सरस्वती पाटील, पुणे जिल्हा रेशन संघटना अध्यक्ष सोमनाथ वचकल, गणेश डांगी, आबू बारगीर, दिपक चौगुले, आनंदा लादे, राजेंद्र कारंडे आदी उपस्थिती होते.