ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता गँग हैदोस घालत आहे. या गँगविरोधात पोलिसांनी कंबर कसली असून, गँगच्या म्होरक्यासह अनेकांच्या मुसक्या आवळल्या आहेत. धाडसत्रही सुरू आहेत. मात्र, या गँगचा हैदोस काही संपताना दिसत नाही. सोमवारी रात्री या गँगने जुन्या वादातून ज्येष्ठ दाम्पत्यावर खुनी हल्ला केल्याची घटना शिवाजीनगरमध्ये घडली. याप्रकरणी गँगच्या चार सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाद्या बगाडे, दीपू शर्मा, तुषार काकडे आणि मोन्या कुचेकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सतीश भीमा काळे यांनी याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीश भीमा काळे हे आपल्या पत्नी आणि मुलांसह सोमवारी रात्री शिवाजीनगर परिसरातील एका मैदानावर झोपले होते. त्यावेळी चार महिन्यांपूर्वी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून कोयता गँगच्या चार सदस्यांनी काळे दाम्पत्यावर खुनी हल्ला केला. यात फिर्यादी काळे गंभीर जखमी झाले आहेत. शिवाजीनगर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.