प्रतिनिधी,कोल्हापूर
टेनिसबॉल क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुधाळी मैदानात झालेल्या अंतिम सामन्यात कोल्हापुरातील (कै.) राणादा स्पोट्स इचलकंरजीतील जिम्नॅशिअम स्पोर्टस्वर 16 धावांनी विजय मिळवत शाहू महाराज छत्रपती चषक टेनिसबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले.पाच हजारांवर प्रेक्षकांच्या उपस्थितीत प्रकाशझोतामध्ये हा अंतिम सामना झाला.या स्पर्धेचे श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त मॉर्निंग स्पोर्टचे आयोजन केले होते.
दरम्यान,स्पर्धेतील अत्यंत चुरशी खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात (कै.) राणादा स्पोर्टस्ने कळंबा येथील वेदांत स्पोर्टस्वर केवळ 1 धावाने निसटता विजय मिळवत अंतिम फेरीत उडी घेतली.या सामन्यासाठी प्रथम फलंदाजी करताना राणादा स्पोर्टचे 7 षटकात सर्वबाद 57 धावा केल्या होत्या.प्रत्युत्तरादाखल खेळताना वेंदात स्पोर्टस्ला 7 षटकात 8 बाद 56 धावांच करता आल्या.त्यामुळे या संघाचा 1 धावाने पराभव झाला.दुसऱ्या उपांत्य सामन्यात इचलकंरजी येथील जिम्नॅशिअम स्पोर्टस्ने रेंदाळ येथील अवनी स्पोर्टस्वर 3 गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अवनी स्पोर्टस्ने 7 षटकात 8 बाद केवळ 40 धावा केल्या होत्या. प्रत्त्युरादाखल खेळताना जिम्मॅशिअम स्पोर्टस्ने 7षटकात 7बाद 41 धावा करुन सामना जिंकला.
प्रकाशझोतात आणि पाच हजारांवर प्रेक्षकांच्या उपस्थितीत राणादा स्पोर्टस् व जिम्नॅनिअम स्पोर्टस् यांच्यात अंतिम लढत झाली. प्रथम फलंदाजी करताना राणादा स्पोर्टस्ने 7 षटकात 6 बाद केवळ 41 धावा केल्या. मात्र प्रत्युत्तरादाखल खेळताना जिम्नॅनिअम स्पोर्टस्ला 7 षटकात 9 बाद फक्त 25 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे या संघाचा 16 धावांनी पराभव होऊन सामना विजयी राणादा स्पोर्टस्च्या गळ्यात स्पर्धा विजेतेपदाची माळ पडली. राणादा स्पोर्टस्ला स्पर्धेच्या जेतेपदी विराजमान करण्यासाठी मुकेश शिंदेने गोलंदाजी 3 बळी घेत फलंदाजीत 15 धावा केल्या. या कामगिरीची दखल घेऊन त्याला सामनावीर म्हणून गौरवले.
बक्षीस वितरण समारंभात उपांत्य फेरीतील पराभूत 2 संघांना प्रत्येकी पाच हजार रुपये तर संपूर्ण स्पर्धेत अष्टपैलु कामगिरी केलेल्या राणादा स्पोर्टस्च्या मुकेश शिंदेला मालिकावीराचा बहुमान देत रोख 5 हजार रुपयांसह 10 हजार रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर भेट देऊन गौरवले. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज प्रज्योत पाटील व उत्कृष्ट फलंदाज लखन गागडे यांनाही प्रत्येकी 2 हजार 500 रुपयां बक्षीस देऊन सन्मानित केले. यानंतर स्पर्धा विजेत्या राणादा स्पोर्टसला 75 हजार रुपये व चषक तर उपविजेत्या जिम्नॅशिअम स्पोर्टस्ला 51 हजार व चषक असे बक्षीस देऊन गौरवले.माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या हस्ते संघांनी बक्षीसे स्वीकारली. यावेळी टेनिसबॉल क्रिकेटचे मैदान गाजवलेल्या कोल्हापुरातील 70 ते 80 माजी क्रिकेटपटूंचा सत्कारही केला. माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक ईश्वर परमार, प्रतापसिंह जाधव, महेश सावंत, सुजय पोतदार, उदय जगताप, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या हस्ते सर्वांनी सत्कार स्वीकारला. यावेळी मॉर्निंग स्पोर्टस्चे अध्यक्ष श्रीधर गाडगीळ, उपाध्यक्ष युवराज संकपाळ, सचिव योगेश सूर्यवंशी, अभिजीत ढेरे व इंद्रजित पाटील, उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीमचे अध्यक्ष रोहित माने व नेपोलीयन सोनुले आदी उपस्थित होते.