समांथा अन् विजय देवरकोंडाचा चित्रपट
समांथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘कुशी’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात दोघांचीही रोमँटिक केमिस्ट्री दिसून येणार आहे. या चित्रपटात रोमांस, ड्रामा, पॅमिली, इमोशन सर्वकाही दिसून येणार आहे. शिव निर्वाण यांच्याकडून दिग्दर्शित हा चित्रपट 1 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे समांथा आणि विजय दुसऱ्यांदा एकत्र आले आहेत. या चित्रपटात जयराम, सचिन खेडेकर, मुरली शर्मा, वेन्नेला किशोर, लक्ष्मी, अली, रोहिणी, राहुल रामकृष्ण, श्रीकांत अयंगर आणि सरन्या हे कलाकार दिसून येणार आहेत. कुशीची कहाणी अत्यंत युनिक लव्हस्टोरीवर आधारित आहे. चित्रपटात विजय देवरकोंडोने एका सैन्याधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. तर समांथा काश्मिरी पंडिताच्या कुटुंबातील युवतीच्या भूमिकेत आहे. दोन्ही व्यक्तिरेखा प्रेमात पडल्यावर जाती वेगवेगळ्या असल्याने विवाहात येणाऱ्या अडचणींवर कशाप्रकारे मात करतात हे या चित्रपटात अत्यंत प्रभावीपणे दर्शविण्यात आले आहे. समांथा याचबरोबर सिटाडेल इंडिया या वेबसीरिजमधून झळकणार आहे. रुसो ब्रदर्सची सीरिज ‘सिटाडेल इंडिया’मध्ये ती वरुण धवनसोबत मुख्य भूमिकेत आहे. तसेच ती लवकरच ‘व्हीडी12’ या चित्रपटात दिसून येणार आहे.