दुरूस्तीच्या नावाखाली बसस्थानक शेड प्रवेशबंद : फोंडा तालुक्याच्या चारही मंत्र्याचे मौनव्रत : प्रवाशांचे हाल
प्रतिनिधी /फोंडा
फोंडय़ातील मध्यावर्ती असलेल्या कदंब महामंडळाच्या बसस्थानकाची गत फोंडा तालुक्यात वारंवार बंद पडत असलेल्या कदंबा बसप्रमाणेच झालेली आहे. मागील काही महिन्यापासून बसस्थानकाचा आसरा दुरूस्तीच्या नावाने प्रवाशांसाठी प्रवेशबंद करून ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे अवकाळी पडलेल्या दोन दिवसांच्या संततदार पावसात प्रवाशांचे हाल झाले आहे. तसेच लांबच्या प्रवासासाठी ताटकळत बसणाऱया प्रवाशांना पावसात भिजत बसची वाट पाहण्य़ाशिवाय पर्याय राहिलेला नाही.
फोंडय़ातील कदंबा बसस्थानक प्रवाशांसाठी धोकादायक बनल्याने ते दुरूस्तीसाठी बंद ठेवण्यात आल्याची नोटीस चिकटवण्यात आलेली आहे खरी मात्र हे करताना प्रवाशांचे पावसाळय़ात काय हाल होणार? याची कोणतीचे उपाययोजना करण्यात आली नसल्याचे आढळून येत नाही. ग्राहकांसाठी महत्चाच्या सेवा देणारी संस्थाही येथून कुठे गायब झाली याचाही ग्राहकांना पत्ता लागत नाही. मान्सूनच्या आगमनापुर्वी प्रवाशांच्या सोयीसाठी तात्पुरती शेड उभारून सोय करण्यात यावी अशी मागणी काही प्रवाशांनी केली आहे. बसस्थनकाच्या रस्ताही मृत्यूचा सापळा बनलेला आहे. मधोमध खड्डे पडलेली असून त्याची डागडूजीही बांधकाम खात्यातर्फे करण्यात आलेली नाही.
बसस्थानक बांदोडा पंचायत क्षेत्रात, सर्व लोकप्रतिनिधींचे मौन
फोंडा शहरातील इंदिरा मार्केट येथील जुने बसस्थानक वाहतूकीची कोंडी होत असल्यामुळे सुसज्ज अशा नवीन बसस्थानकाची शापूर-फोंडा येथे उभारणी करण्यात आली. जुन्या बसस्थानकाकडे थांबा घेतल्यानंतर प्रवाशी बस नवीन बसस्थानकाकडे कूच करतात. मात्र दोन्हीकडे प्रवाशाना आसऱयासाठी सुविधा नाहीत. भर उन्हात व पावसात प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. तात्पुरती बाकाडय़ाची सोय तरी करावी अशी हाक ज्येष्ठ नागरिक प्रवाशांनी दिलेली आहे. शापूर फोंडा हे बांदोडा पंचायत क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे फोंडा पालीका नगरसेवकही या प्रश्नावर चुप्पी साधून आहे. स्थानिक आमदारही या प्रश्नावर कधी बोलत नसल्यामुळे प्रवाशी बसेसवर विसंबून राहणाऱया प्रवाशांचे पुरते हाल झालेले आहे. ज्या फोंडा तालुक्याच्या चारही मतदारसंघातील लोकप्रतिनिधी मंत्रीपद भूषवीत आहेत. असे असतानाही कदंब बसस्थानकाचा प्रश्न बिजत पडलेला आहे हेच मोठे आश्चर्य आहे.