वृत्तसंस्था/ बँकॉक
येथे सुरु असलेल्या थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा स्टार खेळाडू लक्ष्य सेनला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. थायलंडच्या कुनलावतने त्याला पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे. आज, पुरुष एकेरीत कुनलावत व हाँगकाँगच्या चिअुक ली यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. दरम्यान, लक्ष्य सेनच्या पराभवासह थायलंड ओपन स्पर्धेत सर्व भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले आहे.
शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात थायलंडच्या कुनलावतविरुद्ध लक्ष्यने शानदार सुरुवात करत पहिला गेम 21-13 असा जिंकला होता. पण कुनलावतने दुसऱ्या गेममध्ये मात्र जबरदस्त पुनरागमन करत हा गेम 17-21 असा जिंकत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. यानंतर तिसऱ्या व निर्णायक गेममध्येही कुनलावतने आक्रमक खेळताना लक्ष्यला चांगलेच बॅकफूटवर ढकलले. त्याने हा गेम 13-21 असा जिंकत सामना जिंकला व अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात हाँगकाँगच्या चिअुक लीने फ्रान्सच्या ज्युनियर पोपोव्हचा 21-14, 21-16 असा पराभव केला. महिला गटात दक्षिण कोरियाची यंग अॅन व चीनच्या ही बिंगजाओ यांच्यात आज जेतेपदासाठी लढत होईल.