वृत्तसंस्था/ क्वालांलपूर
मलेशियाची राजधानी क्वालांलपूरनजीकच्या सेलांगर शहरात भूस्खलन झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 17 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. ढिगाऱयाखालून 23 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यास यश आले आहे, प्रशासनाकडून शोध आणि बचावकार्य सुरूच ठेवण्यात आले आहे. मृतांमध्ये 5 वर्षीय मुलगा आणि एका महिलेचा समावेश आहे. तर गंभीर जखमी असलेल्या 7 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक जण अद्याप ढिगाऱयाखाली अडकून पडले आहेत. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी 400 जणांचे पथक कार्यरत आहे.
सेलांगर शहराच्या बटांग काली भागात ही घटना घडली आहे. हे ठिकाण एक पिकनिक स्पॉट असून तेथील कॅम्प्समध्ये 90 हून अधिक लोक होते. 30 मीटरच्या उंचीवरून रस्त्यावर ढिगारा कोसळला आणि 1.2 हेक्टर क्षेत्रात फैलावल्याची माहिती पोलीस प्रमुख सुफियान अब्दुल्ला यांनी दिली आहे.