‘सामनावीर’ हर्षिता-निलाक्षी यांची अभेद्य शतकी भागिदारी
वृत्तसंस्था/ केपटाऊन
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या आयसीसीच्या टी-20 महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत लंकन संघाने सलग दुसरा विजय नोंदविला. या स्पर्धेतील रविवारी झालेल्या गट-1 मधील सामन्यात लंकेने बांगलादेशचा 7 गडय़ांनी पराभव केला. सामनावीर हर्षिता समरविक्रमा आणि निलाक्षी डिसिल्वा यांनी चौथ्या गडय़ासाठी अभेद्य 104 धावांची शतकी भागिदारी केली.
चमारी अट्टापट्टूच्या नेतृत्वाखाली लंकन महिला संघाने या स्पर्धेत तीन दिवसांच्या कालावधीत दोन सामने जिंकले आहेत. लंकेने आपल्या सलामीच्या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. रविवारच्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने 20 षटकात 8 बाद 126 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेने 18.2 षटकात 3 बाद 129 धावा जमवित विजय नोंदविला.
बांगलादेशच्या डावामध्ये चार फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाढली. कर्णधार निगार सुल्तानाने 34 चेंडूत 1 चौकारासह 28, शोभना मोस्टेरीने 32 चेंडूत 5 चौकारांसह 29 तर सलामीच्या शमिमा सुल्तानाने 13 चेंडूत 4 चौकारांसह 20 धावा आणि लता मोंडलने 13 चेंडूत 11 धावा जमविल्या. बांगलादेशच्या डावात 10 चौकार नोंदविले गेले. बांगलादेश संघातील शोमा अख्तर 5 धावावर, रिटू मोनी 2 धावावर आणि नाहिदा अख्तर 8 धावावर बाद झाली. लंकेतर्फे ओशादी रणसिंघेने 23 धावात 3, कर्णधार चमारी अट्टापट्टूने 19 धावात 2 तर इनोका रणवीराने 18 धावात 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या डावात 3 फलंदाज पहिल्या 6 षटकात तंबूत परतले. कर्णधार चमारी अट्टापट्टू आणि हर्षिता यांनी सलामीच्या गडय़ासाठी 21 चेंडूत 17 धावा जमविल्या. डावातील चौथ्या षटकात बांगलादेशच्या मारुफा अख्तरने अट्टापट्टूला मौंडलकरवी झेलबाद केले. तिने 17 चेंडूत 3 चौकारांसह 15 धावा जमविल्या. त्यानंतर मारुफा अख्तरने आपल्या पुढील षटकात लंकेच्या गुणरत्नेला केवळ एका धावेवर टिपले. या षटकातील दुसऱया चेंडूवर मारुफा अख्तरने लंकेच्या अनुष्का संजिवनीचा खाते उघडण्यापूर्वी त्रिफळा उडविला. 5.2 षटकात लंकेची स्थिती 3 बाद 25 अशी होती.
हर्षिता समरविक्रमा आणि निलाक्षी डिसिल्वा यांनी समयोचीत फलंदाजी करत चौथ्या गडय़ासाठी अभेद्य 13 षटकार 104 धावांची शतकी भागिदारी करुन आपल्या संघाला 8 चेंडू बाकी ठेऊन 7 गडय़ांनी शानदार विजय मिळवून दिला. हर्षिताने 50 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 69 तर निलाक्षी डिसिल्वाने 38 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 41 धावा झळकविल्या. लंकेच्या डावात 1 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशच्या मारुफा अख्तरने 23 धावात 3 गडी बाद केले. बांगलादेशच्या गोलंदाजांना लंकेची ही जोडी शेवटपर्यंत फोडता आली नाही. या सामन्यात मॅच विनिंग नाबाद अर्धशतक झळकविल्याने हर्षिता समरविक्रमाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. आता या स्पर्धेतील गट-1 मध्ये लंकन संघाने गुणतक्त्यात दोन सामन्यातून चार गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले आहे. बांगलादेश या गटात चौथ्या स्थानावर असून त्यांनी एक सामना गमाविला आहे. बांगलादेशचा पुढील सामना न्यूझीलंड बरोबर 17 फेब्रुवारीला तर लंकेचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाबरोबर 16 फेब्रुवारीला खेळविला जाणार आहे.
संक्षिप्त धावफलक ः बांगलादेश 20 षटकात 8 बाद 126 (शमीमा सुल्ताना 20, शोभना मोस्टेरी 29, निगार सुल्ताना 28, लता मोंडल 11, सलमा खातून नाबाद 9, नाहिदा अख्तर 8, ओशादी रणसिंघे 3-23, चमारी अट्टापट्टू 2-19, इनोका रणवीरा 1-18), लंका – 18.2 षटकात 3 बाद 129 (हर्षिता समरविक्रमा नाबाद 69, चमारी अट्टापट्टू 15, गुणरत्ने 1, संजिवनी 0, निलाक्षी डिसिल्वा नाबाद 41, मारुफा अख्तर 3-23).
आजचे सामने
ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश (गायबेरा)
सायं. 6.30 वा. (स्टार स्पोर्ट्स नेटवर्क)