ऑनलाईन टीम / पुणे :
अहमदनगरच्या खरे कर्जुले गावातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये 12 बॉम्ब, 25 किलो दारुगोळा आणि 25 पिस्तूल राउंडचा समावेश आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
नगरमध्ये लष्कराचे के. रेंज नावाचे प्रशिक्षण केंद्र आहे. प्रशिक्षणादरम्यान रणगाडय़ांमधून बॉम्ब उडवले जातात. ज्या बॉम्बचा स्फोट होणार नाही, ते बॉम्ब लष्कराकडून पुन्हा गोळा केले जातात. के. रेंज प्रशिक्षण केंद्राचे क्षेत्रफळ फार मोठे आहे. हा संपूर्ण भाग जंगलाने व्यापलेला असल्याने स्फोट न झालेले बॉम्ब घेण्यासाठी लष्कराला तेथे पोहचणे शक्य होत नाही. असे बॉम्ब तेथील स्थानिक लोक जंगलातून गोळा करतात आणि फोडून ते भंगारात विकतात.
अशाच प्रकारे खरे कर्जुले गावात एकाने बॉम्बसह दारुगोळा घरात साठवून ठेवल्याची माहिती नगर एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यांनी तात्काळ त्या गावात जाऊन संबंधित घरावर छापा टाकला. यावेळी त्या घरातून 12 बॉम्ब, 25 किलो दारुगोळा आणि 25 पिस्तूल राउंड आढळले. अवैध शस्त्रसाठा बाळगल्या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.