पोलीस अधिक्षकांचा दम : स्थानिक गुन्हे अन्वेषणमध्ये नाराजीचे वारे : काही कर्मचाऱ्यांचा कारवाईतून काढता पाय
कोल्हापूर/आशिष आडिवरेकर
पोलीस दलाचे कान, नाक, डोळे असणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये सध्या नाराजीचे वारे वहात आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या बीटांमध्ये केलेल्या बदलामुळे काही कर्मचाऱ्यांतून नाराजीचा सुर उमटत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी बुधवारी रात्री एलसीबीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बैठक घेऊन डिटेक्शनसोबतच अवैध धंदेही रोखा अन्यथा मुख्यालयात..बदली. असा सज्जड दमच दिला आहे.
कोल्हापूर पोलिसांचा दबदबा पुर्वीच्या काळापासून अबाधित आहे. गुंतागुंतीचे तपास तसेच अवैध व्यवसायांवर लगाम यामुळे गुन्हेगारांची यापूर्वी काही करण्याची टाप होत नव्हती. पोलीस अधिक्षकांच्या विश्वासातील सर्वात जवळची तपास यंत्रणा व पथक म्हणजे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा समजली जाते. मात्र सध्या याच शाखेमध्ये नाराजीचे वारे वाहत असल्याचे चित्र आहे. एलसीबीमध्ये केलेल्या काही फेरबदलांमुळे काही कर्मचारी नाराज आहेत. काही ठराविक कर्मचाऱ्यांनाच महत्वाची अर्थपुर्ण जबाबदारी दिली गेली आहे. यामुळे ‘आमचे काय,’ म्हणत काही कर्मचाऱ्यांनी कारवाईतून अंग बाजूला काढून घेतले आहे. याचाच परिपाक म्हणून जिह्यात अवैध धंद्यांमध्ये सध्या वाढ झाल्याचे चित्र आहे.
मटका, जुगारासह अवैधरित्या गुटखा विक्रीने जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री अचानक पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक घेतली. यामध्ये प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यासोबत संवाद साधत या वर्षात काय काय कारवाई केली, याचा लेखाजोखा मांडण्यास सांगितला. अचानक पडलेल्या या बॉम्बमुळे काही कर्मचारी चांगलेच धास्तावले. अवैध धंदे रोखण्यासाठी कारवाई सुरु करा, डिटेक्शनसोबतच अवैध धंद्यांनाही लगाम घाला. आणखी एक महिन्यात पुन्हा आढावा घेण्यात येईल, यामध्ये कमी पडणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट मुख्यालयाचा रस्ता दाखवला जाईल, असा थेट दमच पोलीस अधिक्षकांनी दिला आहे.
‘एलसीबी’त नाराजी सूर
सध्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये काही फेरबदल केले आहेत. काही जुन्या लोकांकडील बीट नवीन लोकांच्या हाती दिले आहेत, हे बदल काही जुन्या कलेक्टरना रुचलेले नाहीत. यामुळे त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे. एलसीबीमध्ये असूनही ते सध्या अलिप्त असल्यासारखे वावरत आहेत. मात्र पडद्यामागून सूत्रे हलवण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. जुने नाराज असणारे काही कलेक्टर सध्या कुरघोड्या करण्यामध्ये धन्यता मानत आहेत.
पंधरा जण टार्गेटवर
स्थानिक गुन्हे अन्वेषणमध्ये असून अवैध धंदे रोखण्यात अपयशी ठरणारे 15 जण सध्या पोलीस अधिक्षकांच्या टार्गेवर आहेत. या 15 जणांना कारवाई करा अन्यथा मुख्यालयात काम करा, असा दम वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे. अशा 15 जणांची यादी स्वत: पोलीस अधिक्षकांकडूनच तयार करण्यात आली आहे.
सोळा जण अजूनही ठाण मांडून
स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकामध्ये सध्या 65 हून अधिक कर्मचारी आहेत. पाच ते सहा वर्षापेक्षा जास्त काळ होऊनही काही कर्मचारी अद्यापी एलसीबीमध्ये ठाण मांडून आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील 16 कर्मचारी अद्यापी प्रतिनियुक्तीच्या नावाखाली याच ठिकाणी थांबून आहेत. या सोळा कर्मचाऱ्यांनाच का वेगळा न्याय दिला जातो, असा सवाल स्थानिक गुन्हे अन्वेषणमध्ये काम करण्यास इच्छूक कर्मचाऱ्यांमधून केला जात आहे. या कर्मचाऱ्यांना असणाऱ्या वरदहस्तामुळेच हे कर्मचारी अद्यापी या ठिकाणी ठाण मांडून आहेत. त्यांचे या मागचे इंटरेस्ट नेमके काय आहेत, याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.