नगरपालिका-नगरपंचायतीमध्ये व्यवसाय करणाऱ्यांनाही ऑनलाईन परवाना मिळणार
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती याठिकाणी व्यवसाय करणाऱ्यांसाठी परवाना आता ऑनलाईन माध्यमातून दिला जाणार आहे. यासाठी वेबसाईट सुरू करण्यात आली असून त्यावर अर्ज करावयाचे आहेत. याबाबतची माहिती बेंगळूर येथून आलेल्या नगर विकास खात्याच्या उपसंचालिका सुमा यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. महानगरपालिकेमध्ये बैठक घेऊन या वेबसाईटसह इतर योजनांबाबतची माहिती त्यांनी दिली.
यापूर्वी व्यवसाय करण्यासाठी परवाना घेताना महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. महापालिकेमध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून यापूर्वीच परवाना देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये आता नव्याने ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. यापुढे ऑनलाईनद्वारेच संबंधितांना परवाना द्या, असे सुमा यांनी सांगितले.
याचबरोबर स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महापालिकेबरोबरच नगरपंचायती, नगरपालिकादेखील स्वच्छ झाल्या पाहिजेत. त्यासाठी योग्यप्रकारे नियोजन करा आणि सर्व परिसर स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष द्या, असे त्यांनी सांगितले. हे करत असताना कर जमा करण्याकडेही भर देणे गरजेचे आहे. सरकारच्या आदेशानुसार कर वेळेत जमा केला पाहिजे. त्यासाठी सरकारदेखील ग्राहकांना सूट देत असते.
आपल्या परिसरातील मालमत्तांचा सर्व्हे करणे गरजेचे आहे. योग्यप्रकारे सर्व्हे करून मालमत्तांची नोंद केली पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे मालमत्ताधारकांना ऑनलाईन माध्यमातून डिजिटल पद्धतीने नोंद करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. महापालिकेमध्ये यापूर्वीच डिजिटल नोंद सुरू आहे. त्याला पुन्हा अधिक प्रबळ बनविण्यासाठी जनजागृती करा, असेदेखील त्यांनी सांगितले.
महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी महापालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी, नगरविकास नियोजन अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी, महापालिकेच्या उपायुक्त भाग्यश्री हुग्गी, प्रशांत व इतर अधिकारी उपस्थित होते.