उर्वरित आयुष्य तुरुंगात घालवावे लागणार
वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडमधील रुंग्णालयात सात नवजात बालकांचा जीव घेण्याच्या आरोपात दोषी ठरलेली नर्स ल्युसी लेटबी हिला आपले उर्वरित आयुष्य तुरुंगात घालवावे लागणार आहे. लेटबीला आजीवन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 33 वषीय लेटबीने उत्तर इंग्लंडमधील काउंटेस ऑफ चेस्टर हॉस्पिटलमध्ये पाच मुले आणि दोन मुलींची हत्या घडवली होती. 2015 आणि 2016 मध्ये ती सदर हॉस्पिटलमध्ये सेवा बजावत होती. गेल्या आठवड्यातच ल्युसी लेटबीला रुंग्णालयात निरपराध बालकांची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. तिने काही मुलांना मारण्यासाठी त्यांच्या रक्तात हवा आणि इन्सुलिन टोचले. यासोबतच त्यांनी मुलांना मारण्यासाठी जबरदस्तीने जास्त दूध पाजल्याचे तपासात स्पष्ट झाले होते.
ल्युसीला न्यायालयाने सोमवारी आजीवन जन्मठेपेची शिक्षा जाहीर केली. यावेळी तिने शिक्षेच्या सुनावणीसाठी कोर्टरूममध्ये येण्यास नकार दिला. न्यायाधीशांच्या निर्णयानंतर लेटबी हिला आपले उर्वरित आयुष्य तुरुंगात घालवावे लागेल. अशी शिक्षा भोगणारी ब्रिटनच्या इतिहासातील चौथी महिला ठरली आहे.
…हे विश्वासाचे उल्लंघन : न्यायाधीश
सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती गॉस यांनी ल्युसीवरील आरोपांबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले. ‘ल्युसी लेटबीने जे केले ते खरोखरच भयावह होते. तिने केलेली कृती नवजात बालकांचे पालनपोषण आणि काळजी घेण्याच्या सामान्य मानवी प्रवृत्तीच्या पूर्णपणे विरुंद्ध होते. वैद्यकीय व्यवसायात काम करणाऱ्यांवर सर्व नागरिकांनी ठेवलेल्या विश्वासाचे हे घोर उल्लंघन होते’, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे.