कसबा बीड प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील कोगे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बनाबाई ईश्वरा यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडीनंतर सरपंचांनी आपल्या सरपंच काळात गावात जन्माला येणाऱ्या मुलींना दोन हजार रुपये देऊन लेक लाडकी योजना सुरू करुन देणार असल्याचे सांगितले.निवड सभेच्या अध्यक्षस्थानी विस्तार अधिकारी संदेश भोईटे हे होते. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत गावातून मिरवणूक काढली.
करवीर तालुक्यातील कोगे ग्रामपंचायतीवर कुंभीचे उपाध्यक्ष विश्वास पाटील आणि माजी संचालक भगवान पाटील यांच्या गटाची सत्ता आहे. सुरवातीला ठरलेल्या फॉर्म्युलयानुसार सरपंच पदाची विभागणी केली होती. त्यानुसार माजी सरपंच अंबुबाई पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या रिक्त जागेसाठी आज सरपंच निवड पार पडली, असून सरपंच पदासाठी बनाबाई ईश्वरा यादव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवड सभेचे अध्यक्ष भोईटे यांनी बनाबाई यादव यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. निवडीनंतर दोन्ही गटाचे नेते आणि कार्यकर्ते यांनी सरपंच यांचा सत्कार केला.
यावेळी विश्वास पाटील म्हणाले गेल्या तीन वर्षापासून ग्रामपंचायतचा कारभार करत असताना सर्वांना सोबत घेऊन गावच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. पुढील दोन वर्षात गावातील सर्व प्रलंबित विकास कामे पूर्ण करून गावचा कायापालट करू असे आश्वासन दिले.
यावेळी भगवानराव पाटील म्हणाले, कोगे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील प्रत्येक नागरिक आणि घराघरापर्यंत विकास कामे आणि शासनाच्या योजना पोहचवून कोगे ग्रामपंचायत जिल्ह्यामध्ये आदर्शवत करण्याच्या दृष्टीने सरपंच आणि सदस्यांनी कामकाज करावे असे सांगितले. नुतन सरपंच बनाबाई यादव म्हणाल्या, आपल्या सरपंच काळात गावात जन्माला येणाऱ्या मुलींसाठी व्यक्तिगत आपण दोन हजार रुपये देऊन लेक लाडकी ही योजना सुरू करणार आहे. तसेच कोगे गावच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी कुंभी बॅकेचे संचालक रणजीत पाटील, माजी संचालक रंगराव पाटील, उपसरपंच नामदेव सुतार, सदस्य निलम पाटील, बाजीराव निकम, कृष्णात फडतारे, करण पाटील, रमेश सातपुते, शितल फडतारे, नंदा परिट, सरीता कांबळे, दत्तात्रय मांगोरे, तलाटी धनंजय बोराटे, ग्रामसेवक डी के आंबेडकर, शिवाजी वाडकर, तंटामुक्त अध्यक्ष उमाजी इंगवले, पोलिस पाटील दत्तात्रय मिठारी, सुभाष यादव विकास सेवा संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.निवडीनंर फटाक्यांची आतषबाजी करत हलगीच्या कडकडाटात मिरवणूक काढण्यात आली.