ऋतुराज भातेला सामनावीर व मालिकावीर पुरस्कार
![](https://tarunbharat.com/wp-content/uploads/2023/02/06-SPO-2-RUNNERSUP-1.jpg)
बेळगाव : बेळगाव लिकर्स संघटना आयोजित बेळगाव लिकर्स प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेळगाव रिटेल असोसिएशन संघाने बेळगाव लायन्स संघाचा 47 धावांनी पराभव करुन लिकर्स प्रिमियर लीग चषक पटकाविला. ऋतुराज भातेला सामनावीर व मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रिटेल असोसिएशन संघाने सेल्स आर्मी संघाचा 31 धावांनी पराभव तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बेळगाव लायन्स संघाने एनके रायडर्स संघाचा केवळ एका धावाने पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात रिटेल असोसिएशने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 3 गडी बाद 147 धावा केल्या. त्यात ऋतुराज भातेने 69, रतन भातेने 34 तर ओमकार अजगावकरने 25 धावा केल्या. बेळगाव लायन्सतर्फे गुरुनाथ व मोहन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव लायन्स संघाने 10 षटकात 6 गडी बाद 100 धावाच केल्या. त्यात प्रविणने 38 तर गुरुनाथने 17 धावा केल्या. रिटेलतर्फे सुरज देसाईने 3 गडी बाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे गणेश हलगेकर, आनंद चव्हाण, राजू जाधव, गजानन मिसाळे, आनंद कोसंदल, मंजुनाथ पासलकर यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघाला चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज प्रविण अनगोळकर, उत्कृष्ट गोलंदाज सुरज देसाई, सामनावीर व मालिकावीर ऋतुराज भाते यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून ईश्वर इटगी, शिवानंद पाटील, सोहम कुलकर्णी, प्रविण हिरेमठ तर स्कोरर म्हणून प्रमोद जपे यांनी काम पाहिले.