डीवायईएस संघ उपविजेता, अशोका सीएस संघाचा तिसरा क्रमांक, नागराज अष्टपैलू खेळाडू
बेळगाव : साधना क्रीडा केंद्र आयोजीत राज्यस्तरीय निमंत्रितांच्या खो-खो स्पर्धेत रविवारी उशिरा खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात एमएससी कुंदरगी, डीवायईएस दावणगिरीचा अटीतटीच्या लढतीत केवळ 1 गुणाने पराभव करुन पहिला सामना क्रीडा केंद्र चषक पटकाविला. अशोका सीएस संघाला तिसरा क्रमांक तर चामुंडेश्वर म्हैसूरला चोथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. नागराज (अशोका) याला अष्टपैलू खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. धर्मवीर संभाजी उद्यान मैदानात आयोजित या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात डीवायईएस दावणगिरी संघाने चामुंडेश्वरी म्हैसूर संघाचा 2 गुणांनी पराभव केला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एमएससी कुंदरगी संघाने अशोका सीएस चलकेरी संघाचा केवळ 1 गुणाने निसटता पराभव करुन अंतिम फेरीत पराभव केला. अंतिम सामन्यात एमएससी कुंदरगी व स्पोर्ट्स हॉस्टेल दावणगिरी यांच्यात झाला. या सामन्याचे उद्घाटन कर्नाटक राज्य खो-खो संघटनेचे सचिव मल्लिकार्जुन अय्या व खजिनदार वेंकटराज, साधना क्रीडा केंद्राचे अध्यक्ष संजय बेळगावकर आदी मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंची ओळख करुन उद्घाटन करण्यात आले.
प्रथम चेजिंग करताना कुंदरगी संघाने डीवायईएस दावणगिरी संघाचे 10 गडी टीपले. पहिल्या डावात डीवायईएस दावणगिरी संघाने कुंदरगीचे 9 गडी टीपले. यात डीवायईएसचा प्रमुख खेळाडू शरद याने या डावात 3 खेळाडू हवेत सूर मारून टीपले. त्यामुळे पहिली डाव अटीतटीचा झाला. दुसऱ्या डावात कुंदरगीने डीवायईएसचे 7 गडी टीपले. त्यामुळे हा सामना विजयासाठी डीवायईएस दावणगिरी संघाला विजयासाठी 9 गड्यांची आवश्यकता होती. पण शेवटच्या जोडीने उत्तम खेळाचे प्रदर्शन घडवित सामना खेचून आणला. शेवटच्या 30 सेकंदात दावणगिरीला विजयासाठी 2 तर बरोबरीसाठी 1 गड्याची गरज होती. यावेळी मात्र दावणगिरीच्या खेळाडूंनी चुका केल्यामुळे त्यांना गडी बाद करण्यात यश आले नाही. त्यामुळे कुंदरगीने केवळ 1 गड्याने हा सामना विजय संपादन केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे बेळगाव बुडाचे आयुक्त प्रितम नसलापूर, भाजपाचे नेते किरण जाधव, खो-खो संघटनेचे सचिव मल्लिकार्जुन अय्या, खजिनदार वेंकटराज, विठ्ठल हावण्णावर, के. पी. तौनोजी, राजेश लोहार, शांता गडकरी, संजू मर्डी आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या एमएससी कुंदरगी संघाला रोख 25 हजार रु. व चषक, उपविजेत्या डीवायईएस दावणगिरीला 15 हजार रु. व चषक, अशोका सीएस संघाला 10 हजार रु. व चषक तर चौथ्या क्रमांकाच्या चामुंडेश्वरी म्हैसूर संघाला 7 हजार रु. व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट अटॅकर शरद (डीवायईएस), उत्कृष्ट डिफेंडर किरण (कुंदरगी), उगवता खेळाडू दिपक (चामुंडेश्वरी म्हैसूर) तर अष्टपैलू खेळाडू नागराज (अशोका सीएस) यांना चषक व रोखरक्कम देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी कर्नाटक राज्याचे पंच टी. एस. मुर्ती, चिदानंद, चंद्रा, रवी, विश्वास, महोम्मद, बसवराज, अशोक, अजय, व इराण्णा यांनी काम पाहिले. तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विवेक पाटील, सतीश बाचिकर, शैलेश बांदिवडेकर, शिवानंद कोरे, अशोक हलगेकर, पी. ओ. धामणेकर, शिवाजी गोरल, प्रकाश नंदिहळ्ळी, व्ही. चिन्नास्वामी, सुनील देसाई, प्रकाश देसाई, अजित भोसले, एम. वाय. पाटील, अरुण धामणेकर, चार्ली चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक हलगेकर तर प्रकाश नंदिहळ्ळी यांनी आभार मानले.