उत्तर प्रदेशातील महू जिल्हय़ातील एक 42 वषीय पुरुष गेला एक महिना आपल्या घराच्या शेजारी असलेल्या ताडाच्या झाडावर वास्तव्य करून आहे. कुटुंबीयांबरोबर भांडण झाल्याने संतापून तो या झाडावर जाऊन बसला. कुटुंबीयांनी समजूत काढण्याचा प्रयत्न करूनही झाडावरून उतरण्यास त्याने नकार दिला आहे. त्यामुळे त्याचे कुटुंबीय अत्यंत चिंतेत आहेत. तथापि, तो त्यांचे काहीएक ऐकण्यास तयार नाही. त्याला अन्नपाणी झाडावरच द्यावे लागते. पाऊस आला तरी तो झाडावरून उतरत नाही. झाडावरच छत्री उघडून तो पावसापासून आपले संरक्षण करीत आहे. त्याची झोप, इतर देहविधी झाडावरच होत आहेत.
अशा या व्यक्तीचे नाव रामवृक्ष राम असे आहे. ज्या ताडाच्या झाडावर त्याने मुक्काम ठोकला आहे, ते 40 फूट उंच आहे. त्यामुळे झोपलेल्या स्थितीत तो तेथून पडेल की काय, या चिंतेने कुटुंबीयांची झोप उडालेली आहे. त्याचे कुटुंबीय आणि शेजारी आळीपाळीने रात्रभर झाडाखाली पहारा देत आहेत. झाडावरून तो पडल्यास जमिनीवर आदळून त्याला इजा होऊ नये यासाठी चादरीची झोळी झाडाभोवती तयार केली आहे. त्याचे झाडावर बरे चालले आहे, असे दिसून येते. मात्र, खाली कुटुंबीय घरात असूनही त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. त्याचा राग अजूनही शांत झालेला नाही. त्यामुळे तो आणखी किती दिवस झाडावरच मुक्काम करणार, याविषयी काहीही अनुमान करता येत नाही. त्याला तेथून उतरविण्यासाठी पोलिसांनीही प्रयत्न केले. पण आपल्यावर झाडावरून उतरण्याची सक्ती केल्यास तेथून उडी मारून प्राणार्पण करून अशी धमकी त्याने दिली आहे. त्यामुळे प्रशासनाचाही नाईलाज झाला आहे. आता त्याला पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावांमधून या ताडाच्या झाडाभोवती मोठी गर्दी होऊ लागली आहे. त्याला पाहण्यासाठी तिकीट ठेवावे, अशी सूचना काही लोकांनी त्याच्या कुटुंबीयांना केली. तसे केल्यास काही उत्पन्नाची सोय होईल, असा त्यांचा विचार होता. तथापि, त्या कुटुंबीयांनी ही सूचना मात्र मान्य केलेली नाही. एकंदर त्याचा झाडावरील मुक्काम हा पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनला असल्याचे दिसून येते.