लखनौ-चेन्नई सामन्यात पावसाचा व्यत्यय, दोघांना प्रत्येकी एक गुण, चेन्नईचे फिरकी गोलंदाज प्रभावी
वृत्तसंस्था / लखनौ
लखनौ सुपर जायंट्स व चेन्नई सुपरकिंग्स यांच्यातील आयपीएलमधील बुधवारचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आल्याने दोन्ही संघांना गुण विभागून देण्यात आले. काहीशा खराब खेळपट्टीवर लखनौच्या आयुष बदोनीने दर्जेदार नाबाद अर्धशतक नोंदवले तर चेन्नईच्या फिरकी गोलंदाजांनी प्रभावी मारा केला.
या सोळाव्या हंगामात पावसामुळे रद्द झालेला हा पहिला सामना आहे. प्रथम फलंदाजी मिळाल्यावर चेन्नईच्या भेदक माऱ्यासमोर लखनौची स्थिती दहाव्या षटकातच 5 बाद 44 अशी नाजूक झाली होती. चेन्नईच्या गोलंदाजांनी अचूक मारा करीत लखनौच्या फलंदाजांना अजिबात मोकळीक दिली नाही. पण बदोनी व निकोलस पूरन यांनी या अवघड खेळपट्टीवर डाव सावरताना सहाव्या गड्यासाठी 48 चेंडूत 59 धावांची भागीदारी करून संघाला शतकी मजलही मारून दिली. पूरन 31 चेंडूत 20 धावा काढून बाद झाला. चेन्नईच्या फिरकी गोलंदाजांनी अचूक मारा केल्यामुळे लखनौला 125 धावांचीही मजल मारता येणार नाही, असे वाटत होते. केवळ बदोनीच्या आक्रमक खेळीमुळेच त्यांना 19.2 षटकांत 7 बाद 125 धावांपर्यंत मजल मारता आली. यानंतर पावसास सुरुवात झाल्यामुळे खेळ थांबवण्यात आला. पण नंतर पंचांनी दोनदा निरीक्षण केल्यानंतर सामना रद्द केल्याची घोषणा केली.
बदोनीने 33 चेंडूत 2 चौकार, 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 59 धावा फटकावल्या. त्याचे हे आयपीएलमधील दुसरे अर्धशतक आहे. याशिवाय सलामीच्या मनन वोहराने 11 चेंडूत 10 व काईल मेयर्सने 17 चेंडूत 14 धावा जमविल्या. चेन्नईच्या मोईन अली, महीश थीक्षना या फिरकी गोलंदाजांनी प्रत्येकी 2 तर पथिरानाने 22 धावांत 2 व जडेजाने एक बळी मिळविला.
मोईन, थीक्षना व जडेजा यांनी अचूक मारा केल्याने लखनौच्या फलंदाजांना फटकेबाजी करता आली नाही. कोंडी फोडण्यासाठी उत्तुंग फटके मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले. गोलंदाजांनी इतके वर्चस्व राखले होते की, लखनौने पहिला षटकार 15 व्या षटकात नोंदवला. सातव्या क्रमांकावर आलेल्या बदोनीने थीक्षनाला स्लॉग स्वीप करीत हा षटकार मारला. त्यानंतर पुढील षटकातही बदोनीने आणखी एक षटकार लगावला.
कर्णधार धोनीने खेळपट्टीचा अंदाज आल्यावर चौथ्याच षटकात मोईनचा फिरकी मारा सुरू केला. त्याने मेयर्सला गायकवाडकरवी झेलबाद केले. मनन वोहराने थीक्षनाला लॅपशॉट मारण्याचा प्रयत्न केला तर कृणाल पंड्या स्लिपमध्ये रहाणेकरवी झेलबाद झाला. जडेजाने स्टोईनिसला एक अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचीत केले. स्टोईनिसने फॉरवर्ड डिफेन्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू अखेरच्या क्षणी बराच वळल्याने तो बॅटला न लागता ऑफस्टंपवर जाऊन आदळला. करन शर्माने संघर्ष करीत 16 चेंडूत 9 धावा जमविल्या. मोईनने त्याला स्वत:च्याच गोलदांजीवर टिपले.
लखनौ व चेन्नई दोघांचेही प्रत्येकी 11 गुण झाले आहेत. मात्र सरस धावगतीमुळे लखनौ दुसऱ्या व चेन्नई तिसऱ्या स्थानावर आहे.
संक्षिप्त धावफलक : लखनौ सुपरजायंट्स 19.2 षटकांत 7 बाद 125 : वोहरा 11 चेंडूत 10, मेयर्स 17 चेंडूत 2 चौकारांसह 14, करन शर्मा 9, कृणाल पंड्या 0, स्टोईनिस 4 चेंडूत 6, पूरन 31 चेंडूत 20, आयुष बदोनी 33 चेंडूत 2 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 59, गौतम 1, अवांतर 6. गोलंदाजी : मोईन अली 2-13, थीक्षना 2-37, पथिराना 2-22, जडेजा 1-11, दीपक चहर 0-41.