पंजाब किंग्सवर 6 गड्यांनी मात, सामनावीर इशान तसेच सूर्या, तिलक वर्माची जोरदार फटकेबाजी
वृत्तसंस्था/ मोहाली
कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाल्यानंतरही मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सकडून मिळालेले 215 धावांचे आव्हान 7 चेंडू बाकी ठेवत सहज पार करीत 6 गड्यांनी चमकदार विजय मिळविला. त्यांचा हा 9 सामन्यातील पाचवा विजय आहे. सूर्यकुमार यादव, इशान किशन व अखेरच्या टप्प्यात तिलक वर्मा यांनी केलेली फटकेबाजी मुंबईच्या विजयात निर्णायक ठरली. 41 चेंडूत 75 धावांची खेळी करणाऱ्या इशान किशनला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
प्रारंभी लियाम लिव्हिंगस्टोनचे तुफानी अर्धशतक, जितेश शर्मासमवेत त्याने केलेली अभेद्य शतकी भागीदारी यांच्या बळावर पंजाब किंग्सने निर्धारित 20 षटकांत 3 बाद 214 धावा फटकावत मुंबई इंडियन्ससमोर कठीण आव्हान ठेवले होते. त्यानंतर मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली असली तरी सूर्या, इशान, तिलक वर्मा, टिम डेव्हिड यांनी आक्रमक फटकेबाजी करीत पंजाबचे हे आव्हान सहज पार केले. त्यांनी 18.5 षटकांत 4 बाद 216 धावा जमवित विजय साकार केला.
रिषी धवनच्या पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रोहित बाद झाल्यानंतर इशान किशनने प्रथम कॅमेरॉन ग्रीनसमवेत दुसऱ्या गड्यासाठी 33 चेंडूत 54 धावांची भागीदारी केली. एलिसने ग्रीनला 23 धावांवर बाद केले. त्याने 18 चेंडूत 4 चौकार मारले. इशानला सूर्याकडून चांगली साथ मिळाली आणि दोघांनी चौफेर फटकेबाजी करीत धावगतीही वाढविली. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 55 चेंडूत 116 धावांची वेगवान भागीदारी केली, जी शेवटी निर्णायक ठरली. 16 व्या षटकात 170 धावसंख्येवर सूर्या बाद झाला. त्याने 31 चेंडूतच 212 च्या स्ट्राईकरेटने 66 धावा झोडपताना 8 चौकार, 2 षटकार मारले. इशान किशनही आठ धावांची भर पडल्यानंतर बाद झाला. त्याने 41 चेंडूत 7 चौकार, 4 षटकारांची आतषबाजी करीत 75 धावा झोडपल्या. तो बाद झाला तेव्हा मुंबईच्या गोटात थोडी चिंता निर्माण झाली होती. पण टिम डेव्हिड व तिलक वर्मा यांनी आक्रमक फटकेबाजी करीत मुंबईला 7 चेंडू बाकी ठेवून विजय मिळवून दिला. तिलक वर्माने विजयी षटकार मारला. पंजाबचा अर्शदीप सिंग सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 3.5 षटकांत 1 बळी मिळविताना 66 तर सॅम करनने 41 धावा दिल्या. रिषी धवन व नाथन एलिस यांनी बऱ्यापैकी मारा करीत अनुक्रमे 20 व 34 धावा दिल्या. एलिसने 2 तर धवनने एक बळी मिळविला.
लिव्हिंगस्टोन, जितेशची तुफान फटकेबाजी
लिव्हिंगस्टोनने 42 चेंडूत 4 षटकार व 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 82 धावा फटकावताना जितेश शर्मासह चौथ्या गड्यासाठी केवळ 52 चेंडूत अभेद्य 119 धावा जोडल्या. यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्माने 27 चेंडूत 49 धावा फटकावताना 2 षटकार, चार चौकार मारले. पंजाबचा कर्णधार शिखर धवन (20 चेंडूत 30) व मॅथ्यू शॉर्ट (26 चेंडूत 27) यांनीही उपयुक्त योगदान दिले. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 49 धावांची भागीदारी केली.
मुंबईने सलग चौथ्या सामन्यात प्रतिस्पर्ध्याला दोनशेहून अधिक धावा करण्याची संधी दिली. पंजाबने या सामन्यातील पहिल्या दहा षटकांतच 136 धावा झोडपल्या. मुंबईचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चर बराच महागडा ठरला. त्याने 4 षटकांत 56 धावा दिल्या तर अर्शद खानने 48 धावा देत 1 बळी मिळविला. पीयूष चावलाने चार षटकांत 29 धावा देत 2 बळी मिळविले.
3 बाद 95 अशा स्थितीनंतर पंजाबच्या लिव्हिंगस्टोन व जितेश यांनी चौफेर फटकेबाजी करीत मुंबईच्या चावला वगळता सर्वच गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला. लिव्हिंगस्टोन जास्त आक्रमक फटकेबाजी करीत होता. त्याने 32 चेंडूत 7 चौकार, एका षटकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी 44 चेंडूत शतकी भागीदारी पूर्ण केली.
संक्षिप्त धावफलक : पंजाब किंग्स 20 षटकांत 3 बाद 214 : प्रभसिमरन सिंग 7 चेंडूत 9, धवन 20 चेंडूत 5 चौकारांसह 30, शॉर्ट 26 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह 27, लिव्हिंगस्टोन 42 चेंडूत 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 82, जितेश शर्मा 27 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 49, अवांतर 17. गोलंदाजी : अर्शद खान 1-48, चावला 2-29, आर्चर 0-56, आकाश मधवाल 0-37.
मुंबई इंडियन्स 18.5 षटकांत 4 बाद 216 : रोहित शर्मा 0, इशान किशन 41 चेंडूत 7 चौकार, 4 षटकारांसह 75, ग्रीन 18 चेंडूत 4 चौकारांसह 23, सूर्यकुमार 31 चेंडूत 8 चौकार, 2 षटकारांसह 66, टिम डेव्हिड 10 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 19, तिलक वर्मा 10 चेंडूत 1 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 26, अवांतर 7. गोलंदाजी : रिषी धवन 1-20, अर्शदीप 1-66, एलिस 2-34, करन 0-41, राहुल चहर 0-30, हरप्रीत ब्रार 0-21.