खासदार धैर्यशील माने यांची उपस्थिती : जनजागृतीला आला वेग
प्रतिनिधी/ बेळगाव
मराठी अस्मिता दाखवून देण्यासाठी सोमवार दि. 19 रोजी मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वा. व्हॅक्सिनडेपो मैदान परिसरात मराठी भाषिकांचा महा मेळावा होणार आहे. यावेळी तज्ञ समितीचे अध्यक्ष हातकणंगले मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने मराठी भाषिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
बेळगाववर आपला हक्क दाखविण्यासाठी कर्नाटक सरकारकडून सुवर्ण विधानसौध बांधण्यात आले. त्यानंतर मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी दरवर्षी हिवाळी अधिवेशन आयोजित केले जात आहे. ही एकप्रकारची गळचेपी असल्याने मराठी भाषिकांकडून प्रति अधिवेशन म्हणून महामेळावा भरविला जातो. एकीकडे कर्नाटक सरकार बेळगाववर हक्क दाखवत असला तरी बेळगाव हे महाराष्ट्राचेच आहे हे महा मेळाव्यातून ठासून सांगितले जाते.
यावर्षी 19 डिसेंबर पासून कर्नाटक विधीमंडळाचे अधिवेशन घेतले जाणार आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी व्हॅक्सिनडेपो मैदान परिसरात महामेळावा घेतला जाणार आहे. महामेळाव्यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षिय नेते मंडळींना आमंत्रण देण्यात आले आहे. मध्यवर्ती म. ए. समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना पत्र पाठवून आपले प्रतिनिधी पाठवून देण्याचे आवाहन करण्यात आले होते.
बेळगाव-खानापूरमध्ये जनजागृती
महामेळावा यशस्वी करण्यासाठी बेळगाव शहर, तालुका व खानापूरमध्ये विभागवार जागृती बैठका घेतल्या जात आहेत. अधिकाधिक मराठी भाषिक महामेळाव्यामध्ये सहभागी व्हावेत यासाठी प्रत्येक गावा गावात जावून बैठका घेतल्या जात आहेत. शहर म. ए. समिती, तालुका म. ए. समिती, महिला आघाडी, युवा समिती, युवा आघाडी, खानापूर तालुका म. ए. समिती यांच्या मार्फत जागृती बैठका घेतल्या जात आहेत.
शिवसेना खासदारांचा दौरा जाहीर
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार धैर्यशील माने यांनी आपला बेळगाव दौरा जाहीर केला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विनंतीला मान देत त्यांनी महामेळाव्याला उपस्थिती दर्शविण्याचे मान्य केले आहे. या संदर्भात त्यांनी बेळगावच्या पोलीस आयुक्तांना पत्र पाठविले असून, सुरक्षा व्यवस्था पुरवावी असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महामेळाव्याला खासदार धैर्यशील माने यांचे विचार ऐकता येणार आहेत.