विश्वचषक फुटबॉल ः ऑर्सिचचा गोल ठरला निर्णायक
वृत्तसंस्था/ अल रय्यान, कतार
जोस्को ग्वार्डिओल व मिस्लाव ऑर्सिचने नोंदवलेल्या गोलांच्या बळावर क्रोएशियाने मोरोक्कोचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करून विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तिसरे स्थान मिळविले.
पूर्वार्धातच क्रोएशियाने दोन तर मोरोक्कोने एक गोल नोंदवला. क्रोएशियाने उत्तरार्धात ही आघाडी कायम राखत कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केला. सलग दुसऱया स्पर्धेत त्यांनी टॉप तीनमध्ये स्थान मिळविले. 2018 मधील स्पर्धेत क्रोएशियाने दुसरे स्थान मिळविले होते. याशिवाय 1998 मध्येही त्यांनी नेदरलँड्सचा 2-1 असा पराभव करून तिसरे स्थान मिळविले होते.
लोवरो माजेरने फ्रीकिकवर चेंडू इव्हान पेरिसिचकडे लॉब केला. आपल्या मार्करपासून दूर जात त्याने हेडरवर चेंडू बॉक्स क्षेत्रात धाडला. तेथे उभ्या असलेल्या ग्वार्डिओलने डाईव्ह मारत हेडरवर चेंडूला अचूक जाळय़ाची दिशा देत पहिला गोल सातव्या मिनिटाला नोंदवला. मात्र त्यांची ही आघाडी फार वेळ टिकली नाही. दोनच मिनिटानंतर मोरोक्कोने बरोबरी साधली. फ्री किकवरच हा गोलही नोंदवला गेला. क्रोएशियाचा माजेर चेंडू क्लीअर करण्यात चुकला. त्याने हेडरवर चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, पण तो सपशेल हुकला आणि 6 यार्ड बॉक्समध्ये एकटाच असलेल्या मोरोक्कोच्या अश्रफ दारीला चेंडू मिळाला. त्याने हेडर करीत चेंडू जाळय़ात धाडत बरोबरी साधली.
24 व्या मिनिटाला लुका मॉड्रिचने क्रोएशियाला पुन्हा एकदा आघाडी मिळवून दिलीच होती. पण त्याने मारलेला फटका मोरोक्कोचा गोलरक्षक बौनूने दूर केला. पण रिबाऊंडवर मार्को लिवाजाला फटका मारण्यापासून बौनूने रोखले. 29 व्या मिनिटाला अश्रफ हकिमीने पुरविलेल्या क्रॉसला अचूक हेडर करण्यात युसेफ अन नेसिरीने चूक केली आणि मोरोक्कोची ही संधीही वाया गेली. 42 व्या मिनिटाला मिस्लाव ऑर्सिचने क्रोएशियाचा दुसरा गोल नोंदवत आघाडी घेतली. त्याने मारलेला फटका बारला लागून आत गेला. ही आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवत क्रोएशियाने कांस्यपदक निश्चित केले. चौथ्या स्थानापर्यंत मजल मारणारा मोरोक्कोचा हा पहिलाच आफ्रिकन, अरब देश आहे.