ऑनलाईन टीम/तरुण भारत
गुवाहाटीत असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील बंडखोर आमदारांनीही मुंबईत (Mumbai) परतण्याची तयारी केली आहे. उद्या सर्व आमदार मुंबईत बहुमत चाचणीसाठी येतील, असं बंडखोर नेते एकनाथ शिंदेंनी सांगितलं. हे सर्व बंडखोर नेते आज गोव्यात जाणार असल्याची माहिती आहे. त्यांच्यासाठी गोव्यातील (Goa) ताज कन्वेंशन हॉटेलमध्ये ७१ खोल्याही आरक्षित करण्यात आल्याची माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बंडखोर आमदार आज खाजगी विमानाने (Spice Jet) ४.३० वा. च्या दरम्यान गोव्यात पोहोचणार आहेत. यासाठी गोव्यातील ताजमध्ये ७१ रूम्स राखीव ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह५१ आमदार हे गोव्यामध्ये ‘ताज कन्वेंशन’ या हॉटेलमध्ये थांबतील आणि उद्या सकाळी मुंबईला पोहचतील असे सांगण्यात आले आहे.
बहुमत चाचणीसाठी गुवाहाटीला असलेले शिंदे गटातील बंडखोर आमदरही उपस्थित राहणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. उद्या बहुमत चाचणीसाठी आम्ही मुंबईत येणार असं त्यांनी सांगितलं. “मी आताच कामाख्या देवीचं दर्शन घेतलं, महाराष्ट्रातील जनतेच्या समाधानासाठी, सुखासाठी आणि समृद्धीसाठी मी देवीचे आशीर्वाद घेतले, आम्ही सर्व आमदारांना घेऊन अविश्वास प्रस्तावाची प्रक्रिया पार पडण्यासाठी मुंबईत जाणार आहोत, आमच्यासोबत असलेले सर्व आमदार उद्या मुंबईत पोहोचतील”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं