ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीत कोणतीही फूट पडलेली नाही, अजित पवार हे आमचेच नेते आहेत, असं वक्तव्य काल खा. सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. त्यानंतर शरद पवार यांनीही अजित पवार आमचेच असल्याचे सांगत पक्षातील काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे पक्ष फुटला असे होत नसल्याचे स्पष्ट केले. त्यावरुन काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सूचक विधान केलं आहे.
लोंढे म्हणाले, पक्षातील फुटीनंतर शरद पवारांनी इंडिया आघाडीसोबत राहणार असल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे मंत्री पुन्हा-पुन्हा येतात आणि शरद पवारांच्या पाया पडतात. त्यातच काल शरद पवारांनी अजित पवार आमचेच असून, पक्षात फुट नसल्याचे सांगितले. त्यावरुन असे लक्षात येते किंवा आपण असा अंदाज लावू शकतो की, महाराष्ट्राला लवकरच अजित पवार रिटर्न्स भाग-2 बघायला मिळू शकतो.
काय म्हणाले होते पवार?
अजित पवार आमचे आहेत, यात वादच नाही. पक्षात फूट पडणे याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी होते, जर पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला, त्यांनी पक्ष सोडला तर. अशी परिस्थिती येथे नाही. काहींनी वेगळी भूमिका घेतली आहे तो त्यांचा अधिकार आहे. वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणण्याचं काही कारण नाही हा त्यांचा निर्णय आहे.