ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती संघटनेने नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेतला. शरद पवार यांच्या पुढाकाराने स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर आता कुस्तीगीर परिषद बरखास्त होणे, हा पवारांना दुसरा मोठा धक्का मानला जात आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून राज्यात कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले जाते. भारतीय कुस्ती संघटनेच्या काही प्रस्तावांना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नव्हता. महासंघाच्या सुचनांनुसार 15 आणि 23 वयोगटातील कुस्ती स्पर्धांचे आयोजन कुस्तीगीर परिषदेनं केलं नव्हतं. तसेच 23 वर्षाखालील गटासाठी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यासही परिषदेने नकार दर्शवला. त्यामुळे राज्यातील मल्ल आणि कुस्ती संघटनांकडून राज्य कुस्तीगीर परिषदेबाबत तक्रारी आल्या होत्या.
देशात कुस्तीमध्ये महाराष्ट्राचा एक मोठा नावलौकीक आहे. अनेक मल्लांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. पण भारतीय कुस्ती संघटनेच्या निर्देशांचे पालन होत नसल्यामुळे आणि कुस्ती परिषदेकडून अपेक्षित हालचाल न झाल्यामुळे ही परिषद बरखास्त करण्यात आली.
या बरखास्तीनंतर नव्यानं निवडणूक घेऊन भारतीय कुस्तीगीर परिषद गठीत करण्यास सांगण्यात आलं आहे. शरद पवार आणि भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बृजभुषण सिंग यांचे चांगले संबंध आहेत. तरी देखील महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे.