बेळगाव पोलिसांची मुंबईत कारवाई : 20 लाख रुपये जप्त : 75 लाखाहून अधिक उचलली रक्कम
प्रतिनिधी /बेळगाव
सिमेंट व लोखंडाच्या व्यवहारात गुंतवणूक केल्यास दुप्पट नफा मिळेल, असे आमिष दाखवून अनेकांना गंडविणाऱया इचलकरंजी येथील एकाला अटक करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना त्याने मोठय़ा प्रमाणात टोपी घातल्याचे उघडकीस आले आहे.
शिवानंद दादू कुंभार (वय 46, रा. इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. गुन्हे तपास विभागाचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबीचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील, सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, काडय्या चरलिंगमठ, महेश वडीयर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
10 ऑगस्ट 2021 रोजी जाफरवाडी येथील अर्जुन कल्लाप्पा पाटील यांनी सीईएन पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती.
बॉक्साईट रोडवरील यल्लाप्पा मणगुतकर याच्यामार्फत शिवानंद कुंभारने सिमेंट व लोखंडाच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याचे सांगून 75 लाख रुपयांहून अधिक रक्कम उचलली होती.
नफा तर नाहीच. घेतलेली रक्कमही शिवानंदने परत केली नाही. त्यामुळे त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आले होते. घेतलेले पैसे परत करता आले नाही म्हणून शिवानंद कुंभारने सहकुटुंब देश सोडला होता. पत्नी, मुलासमवेत त्याने मालदिव, इजिप्त, दुबई फिरून शेवटी नेपाळमध्ये वास्तव्य केले होते.
यासंबंधीची माहिती मिळताच भारतीय दुतावास व इंटरपोलच्या मदतीने शिवानंद कुंभारला ताब्यात घेण्यासाठी नेपाळ पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. याचवेळी शिवानंद मुंबईला येत असल्याची माहिती मिळताच बेळगाव पोलिसांच्या एका पथकाने मुंबई गाठली. 26 जून रोजी त्याला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता लोखंड व सिमेंटच्या व्यवहारात गुंतवणूक केल्यास दामदुप्पट परतावा मिळणार, असे सांगत शिवानंदने अनेकांकडून पैसे उचलले होते. सुरुवातीला त्याने काही जणांना नफा दिला. ही रक्कम वाढताच त्याने गाव सोडले होते. गुंतवणूकदारांना टोपी घालून मिळविलेल्या पैशातून त्याने महाराष्ट्र व कर्नाटकात मालमत्ता खरेदी केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
शिवानंदवर बडस् कायदा-2019 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच्या व त्याच्या कुटुंबीयांच्या नावे वेगवेगळय़ा बँकांत असलेली सात खाती गोठविण्यात आली असून पोलिसांनी 20 लाख रुपये जप्त केले आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळय़ा पोलीस स्थानकात त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.