खणगाव कुस्ती मैदान : संगमेश बिराजदारचा गुणावर विजय
उमेश मजुकर /बेळगाव
खणगाव येथे खणगाव कुस्तीगिर संघटना गुढीपाडव्यानिमित्त बसवाण्णा यात्रा सालाबादप्रमाणे आयोजित केलेल्या भव्य कुस्ती मैदानात डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटेने राष्ट्रीय चॅम्पियन मनिषकुमार दिल्लीला पंधराव्या मिनिटाला पायाची एकलांगी भरुन एकलांगी डावावर नेत्रदीपक विजय मिळवत उपस्थित 12 हजारहून अधिक कुस्तीशौकिनांची मने जिंकली. सायंकाळी 8.45 मिनिटांनी प्रमुख कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे व राष्ट्रीय चॅम्पियन मनिषकुमार दिल्ली यांच्यात खणगाव कुस्तीगिर संघटना पंच कमिटी व ग्रामस्थांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली. तिसऱ्याच मिनिटाला मनिषकुमारने ऐकेरी पट काढून कार्तिक काटेला खाली घेत मानेवरती कस काढून घुटना डावावरती चीत करण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून कार्तिकने रितसर सुटका करुन घेतली. सहाव्या मिनिटाला कार्तिक काटेने पायाला चाट मारुन मनिषकुमारवर ताबा मिळविला. पण मनिषकुमारने खालून डंकी मारुन त्यातून सुटका करुन घेतली. आठव्या मिनिटाला मनितने एकेरी पट काढत कार्तिकला खाली घेत एकलांगी भरुन चीत करण्याचा प्रयत्न केला. पण या डावात माहिर असलेल्या कार्तिकने आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवत त्यातून सुटका करुन घेतली. अकराव्या मिनिटाला मनिषने दुहेरी पट काढून कार्तिकला खाली घेतले. पण कार्तिकने खालून डंकी मारत बाहेर पडत पायाला चाट मारुन मनितवर कब्जा मिळविला. पंधराव्या मिनिटाला पायाला एकलांगी भरुन एकेरी हाताचा कस चढवित एकलांगी डावावरती मनिषला अस्मान दाखवून उपस्थित 12 हजारहून अधिक कुस्तीशौकिनांची मने जिंकली.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार व वसिम पठाण सांगली ही कुस्ती खणगाव कुस्तीगिर संघटना व निवृत्त सैनिक यांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत तिसऱ्या मिनिटाला एकेरी पट काढून संगमेश बिराजदारने वसिमवर कब्जा मिळवत पायाला एकलांगी भरत चित करण्याचा प्रयत्न केला. पण अनुभवी वसिमने त्यातून सुटका करुन घेतली. दहाव्या मिनिटाला वसिमने गोंधळ एकचाक भरुन संगमेश बिराजदारला खाली घेत चीत करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. परंतु वसिमचा पाठीचा एक भाग टेकल्याने पंचाने निर्णय फेटाळला. चौदाव्या मिनिटाला संगमेश बिराजदारने दोन्ही हाताचे हप्ते भरुन वसिमला अकडीवर चीत करण्याचा प्रयत्न केला. पण वसिमचा एकच खुबा जमिनीला लटकल्याने पंचाने निर्णय फेटाळला. पुन्हा खडाखुडी कुस्ती लावण्याचा निर्णय घेतला. पण वेळेअभावी शेवटी ही कुस्ती गुणांवर घेण्याचा निर्णय गणपत बन्नोसी यांनी घेतला. यावेळी संगमेशने एकेरी पट काढून वसिमवर कब्जा मिळवित गुण मिळवत कुस्तीवर विजय मिळविला. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत किर्तीकुमार काटे शिनोळी याने पवन भांदुगरे याला एकचाक डावावरती प्रेक्षणीय विजय मिळविला. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत किरण अष्टगीने तेजस शिंगाडे सांगली याचा जोळी डावावरती विजय मिळविला. पाचव्या क्रमांकाची कुस्ती विक्रम शिन्नोळी व हणमंत इंगळगी ही कुस्ती डावप्रतिडावाने झुंजली. पण वेळेअभावी ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. सहाव्या क्रमांकाची कुस्ती प्रेम कंग्राळी व संजु इंगळगी ही कुस्ती वेळेअभावी बरोबरीत सोडविण्यात आली. सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत गुत्यांप्पा दावणगिरीने संकल्प कंग्राळीचा एकलांगी डावावर विजय मिळविला. आठव्या क्रमांकाची कुस्ती निरंजन यळ्ळूर व दयानंद शिरगाव ही कुस्ती बरोबरीत राहिली. नवव्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रवीण निलजीने सोनू कोल्हापूर याचा छडीटांग डावावर नेत्रदीपक विजय मिळविला. दहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत ओमकार राशिवडेने शुभम पाटील कंग्राळीचा कलाजंक निकाली डावावरती विजय मिळविला. अकराव्या कुस्तीत बलराज मुचंडी याने शंकर तिर्थकुंडे याच्यावर गुणावर विजय मिळविला. प्रथमेश कंग्राळीने महेश तिर्थकुंडेचा पायलावून घिस्सा डावावरती विजय मिळविला. सुमित कडोलीने ओम कंग्राळीचा घिस्सा डावावरती पराभव केला. ओमकार मुदगेने मनोज खादरवाडे, लक्ष्मण मनेकेरी, करण खादरवाडी, अभि मुतगे, कुणाल यळ्ळूर, मंथन सांबरा, रुपेश कडोली, नितीन मुतगे, चैतन्य गिऱ्याळकर, सुनिल भडगावी, महेश भडगावी, गौतम पाटील, रोहित कणबरकर, मंथन पाटील, सर्फराज राशिवडे, ओमकार कडोली, रुपेश कर्ले, राजवर्धन राशिवडे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर नेत्रदिपक विजय मिळविला. आकर्षक कुस्तीत ओमकार राशिवडेने सिद्धू बेळगावचा पुट्टी डावावरती विजय मिळविला. मेंढ्याच्या कुस्तीत दर्शन कंग्राळीने रोहण मच्छेचा मोळी डावावरती पराभव करुन मेंढ्याचे बक्षीस मिळविले. तर आकर्षक कुस्तीत गणेश कडोलीने सिद्रायचा खालून डंकी मारत विजय मिळविला. आखाड्याचे पंच म्हणून नवीन मुतगे, बळाराम पाटील खणगाव, गणपत बन्नोशी, कृष्णा पाटील कणबरगी, सुरेश अष्टगी, सुरेश पाटील खानापूर, मारुती पाटील, रामा पाटील, अय्याप्पा पाटील, वामण पाटील, बसवाणी सुतार, रमजाण जमादार, बसवाणी पाटील यांनी काम पाहिले. कुस्तीचे समालोचक कृष्णा चौगुले राशिवडे यांनी केले. या कुस्ती मैदानावेळी ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ही कुस्ती यशस्वी करण्यासाठी खणगाव कुस्तीगिर संघटनेने विशेष परिश्रम घेतले.