मनसा क्रिएशन्सची निर्मिती; गायक अक्षय नाईक, कोरिओग्राफी वरदा बेडेकर
पणजी/प्रतिनिधी
मनसा क्रिएशन्सने ‘मन…प्रितस्पंदने शब्दसुरांची’ या मराठी व्हिडिओ गीत आल्बमची निर्मिती केली असून कला आणि संस्कृती संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 12 रोजी संध्याकाळी 5 वाजता या आल्बमचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पाटो-पणजी येथील संचालनालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. हा आल्बम यूटय़ूबच्या माध्यमातून प्रसारित केला जाणार आहे.
या कार्यक्रमाला गोवा पर्यटन विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक दीपक नार्वेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला आणि संस्कृती संचालनालयाचे उपसंचालक अशोक परब उपस्थित राहणार आहेत. तसेच सन्माननीय अतिथी म्हणून गोव्याचे ख्यातनाम फोटोग्राफर आणि गोवा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजतिलक नाईक उपस्थित राहणार आहेत. तर विशेष अतिथी म्हणून पाकशास्त्रतज्ञ, समाजसेविका श्रद्धा श्रीनिवास खलप आणि अबुदाबीस्थित गोमंतकीय साहित्यिक, लेखिका, कवयित्री रूपाली मावजो कीर्तनी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी वाळवे करणार आहेत. ‘मन…प्रितस्पंदने शब्दसुरांची’ हे गीत प्रिया-कालिका बापट यांनी लिहिले असून त्यांच्याच संकल्पनेतून आणि दिग्दर्शनाखाली या व्हिडिओचे चित्रीकरण करण्यात आले आहे. गोव्यातील लोकप्रिय गायक अक्षय नाईक यांनी संगीत दिले आहे तसेच त्यांनीच ते गायलेही आहे. संगीत संयोजन स्वतः अक्षय नाईक यांचे आणि त्याच्याच महालसा रेको स्टुडिओमध्ये ते रेकॉर्ड करण्यात आले आहे. आयक्लिकचे उद्धव केरकर यांनी व्हिडिओग्राफी आणि सिनेमेटोग्राफी केली आहे. या व्हिडिओमध्ये गोव्याची नामवंत कत्थक नृत्यांगना वरदा मयंक बेडेकर यांनी कोरिओग्राफी केली आहे. तसेच वरदा बेडेकर आणि अक्षय नाईक यांच्यावर हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला आहे. सावई-वेरेच्या निसर्गसंपन्न आवारात आणि अनंत देवस्थानच्या प्रासादात या व्हिडिओचे चित्रीकरण करण्यात आले आहे. तरी सर्वांनी या सोहळय़ाला आवर्जून उपस्थिती लावावी, असे मनसा क्रिएशन्सतर्फे कळविण्यात आले आहे.