पर्यावरण रक्षणाच्या उद्देशाने होतेय काम
बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समधील सलून्स सध्या स्वतःच्या ग्राहकांच्या कापलेल्या केसांना एका स्वयंसेवी संस्थेला सोपवत आहेत. ही स्वयंसेवी संस्था या केसांचा वापर करत डोअरमॅट तयार करते. सर्व केसांना गोळा करत ते एका विशेष यंत्रात टाकले जातात. या यंत्रामधून चौकोनी आकाराचे डोअरमॅट्स तयार होऊन बाहेर येतात.
मानवी केसांनी तयार झालेले हे डोअरमॅट मोठय़ा प्रमाणात तेल शोषून घेतात. तसेच हायड्रोकार्बन्सही देखील चिकटवून घेतात. यामुळे पर्यावरणाला नुकसान होण्यापासून रोखले जाते. मावनी केसांपासून डोअरमॅट तयार करणाऱया प्रकल्पाचे सहसंस्थापक पॅट्रिक जॅनसेन यांनी एक किलो केस 7-8 लिटर तेल आणि हायड्रोकार्बन शोषून घेत असल्याचे सांगितले आहे. या मॅट्सना गलिच्छ पाण्याच्या मार्गात ठेवल्यास ते सर्व कचरा शोषून घेतात आणि स्वच्छ झालेले पाणी वाहत जाते.
याचा वापर नद्यांमध्ये वाढत असलेले औद्योगिक प्रदूषण रोखण्यासाठी केला जाऊ शकतो. आमचा हा डोअरमॅट स्थानिक स्तरावर तयार केला जाऊ शकतो. हे नैतिक उत्पादन आहे. म्हणजेच याच्या निर्मितीत कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. उलट याची निर्मिती करून आम्ही प्रदूषण कमी करत आहोत. याच्या मदतीने अनेक शहरांमधील प्रदूषणाचे प्रमाण कमी केले जाऊ शकते असे पॅट्रिक यांनी सांगितले आहे.
माणसाचा एक केस स्वतःच्या वजनाच्या 1 कोटी पट अधिक वजन शोषून घेऊ शकतो. तसेच हा केस तेल आणि हायड्रोकार्बन देखील शोषून घेत असतो. याचबरोबर केराटिन फायबर्स असल्याने हा केस लवचिक देखील असतो असे पॅट्रिक यांनी नमूद केले आहे. ब्रसेल्स येथील हेलियोड सॅलनच्या मॅनेजर इसाबेल वोलकिडिस यांनी स्वयंसेवी संस्थेचे सदस्ये येऊन केस घेऊन जातात आणि आम्ही संस्थेला काही प्रमाणात आर्थिक मदत देखील करत असल्याचे सांगितले आहे.
पूर्वी हे केस कचऱयात फेकले जात होते, परंतु आता याचा वापर करत अनेक गोष्टी तयार केल्या जात आहेत. ही निर्मिती आमच्या देशाच्या पर्यावरणाचे रक्षण करणार आहे. तसा मानवी केसांच्या उत्पादनांना जगभरात प्रसिद्ध करणार असल्याचे इसाबेल यांचे सांगणे आहे.