वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कार निर्माती दिग्गज कंपनी मारुती सुझुकी इंडियाने सुझुकी मोटर कॉर्पोरेशनला (एसएमसी) सुझुकी मोटर गुजरातमधील (एसएमजी) 100 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याला मंजुरी दिली आहे. या व्यवहाराअंतर्गत समभाग खरेदी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने सुझुकी मोटर गुजरातमध्ये एसएमसीला अधिग्रहण करण्यास नुकतीच मंजुरी दिली.
मारुती सुझुकीने म्हटले आहे की एसएमजीमधील हिस्सेदारी खरेदी करण्यासंदर्भात पुढील कार्यवाहीबाबत पुढच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. सध्याला समभागाच्या माध्यमातून हा व्यवहार केला जाणार आहे. या संदर्भात कंपनीच्या समभाग धारकांकडून मात्र अद्याप मंजुरी मिळणे बाकी आहे. पुढच्या बैठकीमध्ये हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी किती समभागांची खरेदी केली जाणार आहे याबाबतचे स्पष्टीकरण दिले जाणार आहे.
अधिग्रहणानंतर….
या अधिग्रहणानंतर सुझुकी मोटर गुजरात ही पूर्णपणे मारुती सुझुकी इंडिया अंतर्गत कार्यरत राहिल. सुझुकी मोटर कॉर्पोरेशन आणि सुझुकी मोटर गुजरात यांच्याकडून करण्यात आलेले उत्पादन मारुती सुझुकी इंडियाला वितरीत केले जाणार आहे. एसएमजीची सध्याची वार्षिक कार उत्पादन क्षमता साडेसात लाख इतकी आहे.