प्रतिनिधी/ पणजी
राज्यात वाळू माफियांचे चाललेले अवैध व्यवसाय रोखण्याच्या अनुषंगाने किनारी पोलिसांनी शनिवारी पहाटे धडक मोहीम राबवित बाणस्तारी नदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांविऊद्ध मोठी कारवाई केली. नदी पात्रातून वाळू उपसणाऱ्या 14 जणांना ताब्यात घेण्याबरोबरच वाळूसह आठ ट्रक, 4 होड्या आदी मिळून सुमारे 2 कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांच्या विरोधात भादंसं कलम 379 आणि खाण व खनिज विकास आणि नियमन कायदा 1957 चे कलम 21 खाली गुन्हा नोंद केला आहे.
पोलीस उपअधीक्षक सुदेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित उमर्ये, नवलेश देसाई यांनी केलेल्या या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. या मोहिमेत उपनिरीक्षक भिका टी. नाईक, साहाय्यक उपनिरीक्षक कार्लोस पॉंटिस, हवालदार सखाराम गावकर, लेलेधर गौडे, देवदत्त शिरवोळकर, योगीराज चोडणकर, सूर्यकांत बोर्डेकर, आयआरबी हवालदार रजनीकांत उलदे, कॉन्स्टेबल महेश खरवत यांचाही सहभाग होता.
बाणस्तारी पुलाजवळील नदीपात्रात रात्रीच्यावेळी बेकायदेशीररित्या वाळू उपसा करण्याचे काम सुरू होते. या प्रकाराची माहिती पोलीस निरीक्षक उमर्ये, देसाई यांना मिळताच त्यांनी पोलीस पथकासमवेत कारवाई करण्यासाठी कमालीची गुप्तता पाळून शनिवारी पहाटे नदीपात्राठिकाणी धाड घातली. वाळू उपसा करण्यात गुंतलेल्या 14 जणांना पोलिसांनी ताब्यात घेत 8 ट्रकांमध्ये भरलेली वाळू वाहनांसह जप्त केली. तसेच वाळू काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 4 होड्याही त्यांनी हस्तगत केल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितांमध्ये सतीराम मूलदेव प्रजापती (वय 55), अजित ब्रिजबिहारी सहानी (वय 23), कृष्णकुमार नंदलाल सहानी (वय 21), रामानंद मुन्ना सहानी (वय 27), गणेश रघु सहानी (वय 42), दुहापन रमेश राजबट (वय 25), मुसाफिर जीत सहानी ( वय 50), अनटून राजगोविंद सहानी (वय 30), प्रल्हाद प्रसाद वार शामलाल सहानी (वय 59) यांचा समावेश असून हे सर्व कामगार उत्तरप्रदेश येथील आहेत. अटक केलेले ट्रकचालक पुढीलप्रमाणे : उमेश वेळीप (वेळीपवाडा बाळ्ळी केपे, जीए-02-टी-8483) कृष्णा वेळीप (बाळ्ळी केपे, जीए-08-यू-6275) तुकाराम वेळीप (बार्से केपे ट्रक मालक 6275, 8586 ) मोहम्मद हनिफ ऊमडमळा हाऊसिंग बोर्ड नावेली जीए-02-व्ही-7763 चा चालक),
पोलिसांनी पहाटेच्यावेळी केलेली ही कारवाई अलीकडच्या काळातील सर्वात मोठी कारवाई आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या आदेशावरून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांविऊद्ध ही कारवाई केली जात आहे. बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांविरूद्ध विशेष यंत्रणाही कार्यान्वित केली असल्याचे पोलीस निरीक्षक अजित उमर्ये यांनी सांगितले. ही कारवाई करण्यापूर्वी पोलिसांनी संशयितांवर पाळत ठेवली होती. पोलिसांनी शिस्तबद्धरित्या सापळा रचून पहाटेच्यावेळी कारवाई करताना उपसा करणाऱ्यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत 8 जणांवर कारवाई केली असली तरी यात गुंतलेल्यांचाही पोलीस शोध घेत असल्याचे निरीक्षक उमर्ये यांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्या संशयितांना पणजी सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. उपअधीक्षक सुदेश नार्वेकर यांच्या देखरेखीखाली निरीक्षक अजित उमर्ये पुढील तपास करीत आहेत.
वाळू माफियांमध्ये अस्वस्थता
बाणस्तारी येथील नदीपात्रातील वाळू उपसा करताना रंगेहाथ पकडलेल्या संशयितांमुळे वाळू माफियांत अस्वस्थता पसरली आहे. पोलिसांनी धडक कारवाई करताना कमालीची गुप्तता पाळल्यामुळेच वाळू उपसा करणाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले. यापूर्वीच्या घटनेत पोलिसांकडून दिवसा कारवाई झाल्यास संशयित पळ काढण्यात यशस्वी होत असत. परंतु या घटनेत पहाटेच्यावेळी कारवाई केल्याने शिवाय कोणत्याही प्रकारची माहिती बाहेर पडू नये यासाठी पोलिसांनी दक्षता घेतल्यानेच मोठी कारवाई झाल्याचे निरीक्षक अजित उमर्ये यांनी सांगितले.