सावंतवाडी : प्रतिनिधी
सिंधुदुर्गातील सह्कारमधले ज्येष्ठ नेते तथा सावंतवाडी अर्बन बँकेचे अध्यक्ष पी . एफ डॉन्टस यांचे रविवारी मध्यरात्री कोलगाव येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले . ते ६५ वर्षांचे होते . ते कॅथलिक अर्बन बँकेचे विद्यमान अध्यक्ष तर सैनिक नागरी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक होते . डॉन्टस यांनी जिल्ह्यातील माजी सैनिकांना संघटित करून त्यांचे न्याय्य , हक्क मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले . माजी सैनिकांची संघटना ही त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली . आंबोली येथील सैनिक स्कूल उभारणीत त्यांचा मोठा हातभार होता . सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी सहकार विभागात काम केले होते . त्यानंतर त्यांनी राज्य कर्मचारी संघटनेची विविध पदे भूषविली . याच काळात त्यांनी माजी सैनिकांना संघटित करण्यास सुरुवात केली . १९९१ मध्ये सुधीर सावंत सैन्यातून स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात उतरले . त्यांच्या सोबत डॉन्टस यांनी काम केले. सुधीर सावंत खासदार झाले . त्यांच्या समवेत त्यांनी राजकारणात भरारी घेतली . काँग्रेस पक्षाची अनेक पदे त्यांनी भूषवली . त्यांच्या पश्चात पत्नी ,भाऊ ,मुलगा, दोन मुली असा परिवार आहे .त्यांच्या निधनाने सहकाराची मोठी हानी झालीय अशा प्रतिक्रिया उमटत आहेत .