चौकशी करण्याची लाभार्थींची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत वड्डरवाडी-रामनगर येथील वॉर्ड क्रमांक 18 व 19 मधील झोपडपट्टीवासियांना घरे मंजूर झाली. प्रत्येकाला 3 लाख 50 हजार रुपये मंजूर झाले. त्यानंतर 3 लाख 66 हजार 419 रुपये लाभार्थीला द्यावे लागले. त्यामुळे एकूण 7 लाख 16 हजार 419 रुपये कंत्राटदाराला देण्यात आले. मात्र कंत्राटदाराने केवळ 3 लाख 46 हजार रुपयांतच घरे बांधून दिली. त्यामुळे दुपटीने फायदा घेतला आहे. तेंव्हा याची चौकशी करून संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
एम सॅन्ड, विटा, सिमेंट, लोखंड, खडी यासाठी केवळ 1 लाख 50 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. त्यानंतर इतर असा खर्च करून जवळपास तीन ते साडेतीन लाखांतच घरे बांधण्यात आली आहेत. मात्र यामध्ये एजंटांचा सुळसुळाट वाढल्याने लाभार्थींना त्याचा मोठा फटका बसला आहे. तेंव्हा याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी यल्लाप्पा बंडीवड्डर, हणमंत गारगोटी, परशराम अष्टेकर, विनोद अष्टेकर, सुनील सांगावकर, परशराम गाडीवड्डर यांच्यासह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.