प्रतिनिधी /बेळगाव
जगभरातील ख्रिश्चन लोक 2 नोव्हेंबर हा ‘ऑल सोल्स डे’ म्हणून साजरा करतात. आपापल्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तींसाठी बेळगाव शहर आणि शेजारच्या अनेक ठिकाणी ख्रिश्चनांनी चर्च आणि दफनभूमीत बुधवारी विशेष प्रार्थना केली.
ऑल सोल्स डे दरवषी ऑल सेंट्स डेच्या दुसऱयाच दिवशी साजरा केला जातो. बुधवारी शहरातील ख्रिश्चनांनी चर्चमध्ये विशेष प्रार्थना केल्या. त्यानंतर संध्याकाळी स्मशानभूमींना भेट दिली. दरवषी, प्रार्थनेसाठी शहर व परिसरातील दफनभूमी स्वच्छ केल्या जातात.
त्यानुसार जुनी स्मशानभूमी आणि ब्रिटिश स्मशानभूमी, क्लब रोड येथील स्मशानभूमी, शहापूर व इतर ठिकाणी विशेष सामूहिक प्रार्थना आयोजित करण्यात आल्या होत्या. सेंट झेवियर्स हायस्कूलचे प्राचार्य रेव्ह. फादर सिरिल ब्रॅग्स यांनी गोल्फ कोर्सजवळील स्मशानभूमीत प्रवचन दिले. आपण जगत असताना शेवटदेखील लक्षात ठेवला पाहिजे. कारण प्रत्येकवषी आपण मृत्यूच्या जवळ असतो. आपण नश्वर आहोत आणि मृत्यूनंतर आपण आपल्यासोबत काहीही घेऊन जाऊ शकत नाही. परंतु आपण केवळ आपली चांगली कृत्ये आणि आदर्श उदाहरण ठेऊन जाऊ शकतो, असे फादर ब्रॅग्स म्हणाले. त्यांनी लोकांना स्वतःला शुद्ध करण्यासाठी सर्व पापांचे प्रायश्चित्त करण्याचे आवाहन केले. बरेच लोक आहेत जे स्मशानभूमीतील प्रार्थनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. तथापि, हे शुद्धीकरणाचे ठिकाण आहे कारण प्रत्येकाला येथे आपल्या मृत्यूबद्दल विचार करण्यास भाग पाडले जाते. म्हणून वर्षातून किमान एकदा आपण दफन झालेल्यांसाठी प्रार्थना केली पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी रेव्ह. फादर विजय मेंडिथ, फादर जो डिसोझा, फादर सोलन आणि इतर धर्मगुरु उपस्थित होते.