6 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून निवड प्रक्रियेला होणार प्रारंभ
प्रतिनिधी /बेळगाव
महापौर-उपमहापौर निवडणुकीचे बिगुल वाजले असून नगरसेवकांना तसेच लोकप्रतिनिधींना नोटीस बजाविण्यात आली आहे. दि. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून निवड प्रक्रियेला प्रारंभ होणार असून दुपारी 3 वाजता निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे आता महापौर-उपमहापौर निवडीच्या हालचालींना वेग आला आहे.
महापालिका निवडणूक होऊन सव्वावर्ष होत आले. मात्र मागासवर्गीय आरक्षणाच्या वादामुळे निवडणूक प्रक्रिया रखडली हेती. सप्टेंबर महिन्यात प्रादेशिक आयुक्त कार्यालयातून नगरविकास खात्याला पत्र पाठवून कोणत्या आरक्षणानुसार निवडणूक घ्यायची? अशी विचारणा केली होती.
महापालिका निवडणुका होण्यास विलंब झाल्याने 21, 22, 23 आणि 24 व्या कार्यकालावधीसाठी महापौर-उपमहापौर आरक्षण नगरविकास खात्याने जाहीर केले होते. त्यामुळे यापैकी 21 व्या कार्यकालावधीच्या आरक्षणानुसार महापौर-उपमहापौर निवड करण्याचे स्पष्टीकरण नगरविकास खात्याने दिले आहे. सदर पत्र दि. 9 जानेवारी रोजी प्रादेशिक आयुक्त कार्यालयाला मिळाले आहे. त्यानंतर महापौर-उपमहापौर निवड करण्याच्यादृष्टीने हालचाली वाढल्या आहेत.
प्रादेशिक आयुक्तांनी त्वरित दुसऱ्या दिवशी पत्रक प्रसिद्ध करून दि. 6 फेब्रुवारी रोजी महापौर-उपमहापौर निवडणूक घेतली जाईल, अशी घोषणा केली होती. या पाठोपाठ नगरसेवकांना निवडणुकीची नोटीसदेखील बजाविण्यात आली आहे. सोमवारी सकाळी महापालिकेच्या कौन्सिल विभागामार्फत 58 नगरसेवक आणि 7 लोकप्रतिनिधींना महापौर-उपमहापौर निवडणुकीची नोटीस देण्याची सूचना करण्यात आली. प्रादेशिक आयुक्तांच्या नोटिसीसह महापालिकेची नोटीसदेखील नगरसेवकांना देण्यात आली.
महसूल निरीक्षकांकरवी सोमवारी सकाळपासून नोटीस बजाविण्याच्या कार्यवाहीस प्रारंभ करण्यात आला. महापौर पद सामान्य महिला आणि उपमहापौर पद मागासवर्गीय ‘ब’ महिलेकरिता राखीव आहे. या आरक्षणानुसार दि. 6 फेब्रुवारी रोजी महापौर-उपमहापौर निवडणूक घेतली जाणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर दुपारी अर्जांची छाननी झाल्यानंतर 3 वाजता बैठकीस प्रारंभ होणार आहे. अर्ज माघारीसाठी वेळ देऊन मतदान प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे. नगरसेवकांची पहिली बैठक असल्याने शपथविधी कार्यक्रम होणार आहे.
महापौर-उपमहापौर निवडीची प्रतीक्षा सर्वांनाच होती. अखेर ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार असून दि. 6 फेब्रुवारी रोजी शहरवासियांना महापौर-उपमहापौर लाभणार आहेत.
अल्पसंख्याक आयोगाच्या सूचना धुडकावून केवळ कानडी भाषेत नोटिसा
नोटीस पोहोचविण्याची जबाबदारी महसूल निरीक्षकांवर सोपविण्यात आली आहे. यापूर्वी कन्नड, इंग्रजी आणि मराठी अशा तिन्ही भाषांतून महापौर-उपमहापौर निवडणुकीच्या नोटिसा बजाविण्यात येत होत्या. मात्र भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या सूचना धुडकावून केवळ कानडी भाषेत नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. यावेळी इंग्रजीसह मराठी भाषेतून नोटीस बजाविण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे प्रादेशिक आयुक्त कार्यालयातही कानडीकरणाचा वरवंटा फिरविण्यात येत असल्याचे निदर्शनास येते.