66 वर्षीय लेस्लीसोबत विवाहबंधनात अडकणार
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
माध्यम सम्राट असे बिरुद मिळविलेले रुपर्ट मर्डोक वयाच्या 92 व्या वर्षी पाचवा विवाह करणार आहेत. रुपर्ट हे 66 वर्षीय एन लेस्ली स्मिथसोबत विवाहबद्ध होणार आहेत. लेस्ली स्मिथ यांचा हा तिसरा विवाह असणार आहे. या दोघांची सप्टेंबर महिन्यात कॅलिफोर्नियामध्ये भेट झाली होती. दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. रुपर्ट मर्डोक यांनी मागील वर्षी स्वतःच्या चौथ्या पत्नीपासून घटस्फोट घेतला होता.
मी प्रेमात पडण्यापासून घाबरतो, परंतु माझे हे अखेरचे प्रेम असेल हे माहित आहे. सेंट पॅट्रिक्स डेवेळी लेस्लीला प्रपोज केले होते असे मर्डोक यांनी सांगितले आहे. मर्डोक यांना पहिल्या तीन पत्नींपासून 6 मुले आहेत. 2016 मध्ये मर्डोक यांनी वयाच्या 85 व्या वर्षी 65 वर्षीय मॉडेल जेरी हॉलसोबत विवाह केला होता. हा विवाह 6 वर्षे टिकला.
मर्डोक यांचा पहिला विवाह पॅट्रिसिया बुकसोबत 1956 साली झाला होता. हा विवाह 1967 पर्यंत टिकू शकला होता. तर दुसरा विवाह 1967 मध्ये अन्ना मारिया टोर्वसोबत झाला आणि 1999 पर्यंत तो टिकला होता. 1999 मध्ये वेंडी देंगसोबत त्यांनी तिसरा विवाह केला होता. 2013 मध्ये दोघेही विभक्त झाले होते. 2016 मध्ये त्यांनी मॉडेल जेरी हॉलसोबत विवाह केला होता.
1931 साली ऑस्ट्रेलियात जन्मलेले मर्डोक हे सध्या अमेरिकेचे नागरिक आहेत. 1952 मध्ये वारशादाखल वडिलांकडून मिळालेली कंपनी ऑस्ट्रेलिया न्यूज लिमिटेडचे ते व्यवस्थापकीय संचालक झाले होते. 50 आणि 60 च्या दशकात त्यांनी माध्यम उद्योगात मोठी झेप घेतली होती. मर्डोक हे अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमधील प्रख्यात वृत्तपत्रं तसेच वाहिन्यांचे मालक आहेत.
मर्डोक हे ब्रिटनमधील प्रसिद्ध द टाइम्स, संडे टाइम्स, द सन समवेत अनेक वृत्तपत्रांचे मालक आहेत. अमेरिकेत वॉल स्ट्रीट जर्नल, न्यूयॉर्क पोस्ट, डाउ जोन्स लोकल मीडिया ग्रूप, 7 न्यूज इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, फॉक्स टीव्ही ग्रूप आणि स्काय इटालियामध्ये त्यांचा मालकी हक्क आहे. ट्वेंटी-फर्स्ट सेंच्युरी फॉक्स ही मर्डोक यांची प्रसिद्ध चित्रपटनिर्मिती कंपनी आहे. स्टार स्पोर्ट्स, नॅशनल जियोग्राफिक, ब्रिटश स्काय ब्रॉडकास्टरमध्ये त्यांची हिस्सेदारी आहे.