नातेवाईकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले
कुडाळ : प्रतिनिधी
गोवा येथे अत्यंत दयनीय अवस्थेत आढळलेल्या आणि संविता आश्रम (पणदूर) येथे आश्रयाला असलेल्या निराधार व मनोरुग्ण प्रौढ महिलेच्या नातेवाईकांशी अखेर एका वर्षानंतर गाठ पडली. शिंगारीदेवी रामलाल विश्वकर्मा (54 ,मूळ उत्तरप्रदेश व सध्या रा.मानखुर्द – मुबई ) असे तिचे नाव असून गुगलवर तिची माहिती अपलोड केल्यानंतर जीवन आनंद संस्थेला तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात यश आले. संविता आश्रमात रविवारी शिंगारीदेवीची भेट झाल्यानंतर नातेवाईकाच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले.
2 9 ऑगस्ट 2022 रोजी गोवा राज्यातील कोलवाले पुलाजवळ अत्यंत दयनीय परिस्थीतीत जीवन कंठीत असलेल्या एका निराधार अनोळखी व मनोरूग्ण महिलेची माहिती म्हापसा येथील सारस्वत महाविद्यालयातील किर्ती सावकार यांनी पणदूर येथील जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदिप परब यांना दिली. रस्त्यावरच्या निराधार वंचितांच्या पुनर्वसनासाठी कार्य करीत असलेल्या संदिप परब यांनी तात्काळ कार्यकर्त्यांच्या मदतीने तात्काळ तेथे धाव घेतली आणि त्या महिलेला कोलावले पोलिस ठाण्याच्या परवानगीने येथील संविता आश्रमात दाखल केले होते.
आश्रमात शिंगारीदेवी हिच्यावर मानसोपचार तज्ज्ञांमार्फत औषधोपचार सुरू केले. तिला उत्तरप्रदेशची भाषा समजते हे लक्षात आले.परंतु ती विचारणा केल्यानंतर काही बोलत नव्हती.आश्रमातील कर्मचाऱ्यांनी तिची सेवा सुश्रुषा व्यवस्थित केली. हळु हळू तिची प्रकृती सुधारू लागली. मुंबई येथील असल्याचे तिच्या बोलण्यातून जाणवले. नंतर संस्थापक संदीप परब यानी यापूर्वीच तिचे वर्णन व फोटो गुगल वर अपलोड केला होता. त्याचा फायदा झाला. शिंगारीदेवी या मानखुर्द – मुबई परिसरातील असल्याचे समजले. तिचा शोध घेण्यात संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले. त्या भागात कार्य करणा-या अपनालय संस्थेच्या सिनिअर प्रोगाम मँनेजर सुनिता चौरे व स्थानिक कार्यकर्त्या ज्योती लाटे यांनी शिंगारीदेवीचे कुटुंबिय शोधण्याकामी सहाय्य केले. त्यांनी शिंगारीदेवीच्या कुटुंबाचा पत्ता शोधून काढत त्या सविता आश्रमात असल्याची माहिती दिली.