‘सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’तर्फे चळवळ राबविणार : प्रा. प्रजल साखरदांडे यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
कर्नाटक म्हादई वळविण्याचा प्र्यात्न करीत आहे. त्यांच्या सुरात गोव्याचेही काही मोठे लोक सुर मिळवित आहे त्यासाठी म्हादई वाचविणे नितांत गरजेचे आहे. यासाठी म्हादई बचाव आंदोलन गावागावात पोचवून लोक चळवळ निर्माण करण्यात येईल, असे सेव्ह म्हादई सेव्ह गोवा फ्रंटचे प्रा. प्रजल साखरदांडे यांनी सांगितले. तालुका तसेच मतदारसंघस्तरीय समित्या निवडून गावागावात कोपरा बैठका घेऊन म्हादईचा विषय सविस्तरपणे लोकांपर्यंत पोचविला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
काल सोमवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रजल साखरदांडे बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत महेश म्हांबरे, अॅड हृदयनाथ शिरोडकर, अॅन्थनी डिसिल्वा, सलमान खान, मारियान फेर्रांव व अन्य उपस्थित होते. आज म्हादईचे पाणी कर्नाटकांने वळविले तर संपूर्ण गोव्यावर त्याचा गंभीर परिणाम होईल. याची कित्येक लोकांना जाणीव नाही. त्याची जाणीव करून देणे आवश्यक आहे. ग्रामपातळीवर म्हादईचा विषय मांडणे गरजेचे आहे. शनिवरपर्यंत हे काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर रविवारी संध्याकाळी 7.30 वा. सर्व धर्मातील लोकांनी आपापाल्या परीने म्हादईचे पूजन करून एक वात म्हादईसाठी म्हणून दिवा, मेणबत्ती समई पेटवावी तसेच त्याचा फोटो विविध ग्रुपमध्ये प्रसारित करावा, असे आवाहन साखरदांडे यांनी केले आहे.
गोवा बंद करून किंवा तोडफोड करून सर्व सामान्य लोकांना त्रास देण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांपर्यंत विषय पोचविणे महत्वाचे आहे. लोकांना विषय पटला की प्रत्येकाला हे आंदोलन आपले वाटेल आणि प्रत्येकजण आंदोलना सहभागी होईल. म्हादईचा विषय हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे. त्यासाठी सर्वानी एकत्र येणे फार महत्वाचे आहे. एखाद्यावेळी गोवा बंद करण्याचे झाल्यास प्रत्येक जण आपल्या घरात राहून शांततेत गोवा बंद आंदोलन केले जाईल, असेही साखरदांडे यांनी सांगितले. दि. 16 फेब्रुवारी रोजी पाटो पुलावर म्हादई आरती करण्यात येणार त्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रा. साखरदांडे यांनी केले.